सीबीआयला न्यायालयाची परवानगी

शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिच्यासह अन्य दोघा आरोपींची कारागृहात चौकशी करू देण्याची केंद्रीय अन्वेषण विभागाची (सीबीआय) मागणी महानगर दंडाधिकाऱ्यांनी बुधवारी मान्य केली. त्यामुळे इंद्राणीसह अन्य आरोपींची सीबीआयला कारागृहात १२ दिवस चौकशी करता येणार आहे.
गेल्याच महिन्यात राज्य सरकारने मुंबई पोलिसांकडून तपासाची सूत्रे काढून घेत ती सीबीआयकडे वर्ग केली होती. परंतु तोपर्यंत इंद्राणी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि चालक श्यामवर राय या तिघांना महानगर दंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे सीबीआयने या तिघांची कारागृहात जाऊन चौकशी करू देण्याची विनंती एका अर्जाद्वारे न्यायालयाकडे केली होती. तपास नुकताच आपल्याकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे तिन्ही आरोपींची चौकशी करणे आवश्यक आहे आणि परवानगी नाकारण्यात आली तर मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासावरच अवलंबून राहावे लागेल, असे सीबीआयने चौकशीसाठी तीन आठवडय़ांची परवानगी मागताना म्हटले होते. इंद्राणी आणि खन्ना यांच्या वकिलांकडून सीबीआयच्या मागणीला विरोध करण्यात आला नाही. मात्र राय याच्या वकिलाकडून तपास पूर्ण झाल्याचे सांगत विरोध करण्यात आला होता.
न्यायालयाने या अर्जावर निर्णय देताना सीबीआयला कारागृहात जाऊन तिन्ही आरोपींची चौकशी करण्यास परवानगी दिली. या तिघांची न्यायालयीन कोठडी १९ ऑक्टोबपर्यंत संपत असून, तोपर्यंत सीबीआयचे अधिकारी या तिघांची कारागृहात जाऊन चौकशी करू शकतील. परंतु त्यांची आणखी चौकशी करण्याची गरज आहे असे तपास अधिकाऱ्यांना वाटले तर सीबीआयला पुन्हा एकदा परवानगीसाठी अर्ज करावा लागेल, असेही न्यायालयाने परवानगी देताना स्पष्ट केले.