शीना बोरा हत्याकांडाला नवे वळण; तिघांवर हत्येचा आरोप

बहुचर्चित शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जी व तिचा दुसरा व तिसरा पती अनुक्रमे संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी यांच्यावर विशेष सीबीआय न्यायालयाने शीनाच्या हत्येचा कट रचून तिची हत्या केल्याचा आरोप निश्चित केला.तिघांनीही त्यांच्यावरील हा आरोप अमान्य केला.  या बहुचर्चित खटल्याच्या सुनावणीला १ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असल्याचे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. विशेष म्हणजे आरोपनिश्चितीची प्रक्रिया पार पडताच इंद्राणीने पीटरपासून आपल्याला घटस्फोट हवा असल्याचे न्यायालयाला सांगून खळबळ उडवून दिली. मात्र ही तुम्हा पती-पत्नीची वैयक्तिक बाब असून त्याचा न्यायालयाशी काहीही संबंध नाही. परंतु वकिलाशी सल्लामसलत करून त्या प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता, अशी सूचना न्यायालयाने इंद्राणीला केली.

इंद्राणी, संजीव आणि पीटर या तिघांवर शीनाच्या हत्येचा कट रचणे, तिचे अपहरण करणे, त्यानंतर तिची हत्या करणे, गुन्ह्यबाबत खोटी माहिती देऊन दिशाभूल करणे आणि पुराव्यांची विल्हेवाट लावणे असे मुख्य आरोप ठेवण्यात आले आहेत.

विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी तिघांनाही एकामागोमाग एक असे आरोपीच्या पिंजऱ्यात बोलावून त्यांना त्यांच्यावरील आरोपनिश्चितीबाबत सांगितले. त्यावर तिघांनीही हे आरोप मान्य नसल्याचे सांगत निष्पाप असल्याचा दावा केला.

याव्यतिरिक्त तिघांवर शीनाचा भाऊ मिखाईल याच्या हत्येचा प्रयत्न करण्याचा कट रचल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे. २४ एप्रिल २०१२ रोजी शीनाची हत्या करण्यात आली. ऑगस्ट २०१५ मध्ये इंद्राणीला शीनाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली.

तिचा माजी चालक आणि याप्रकरणी माफीचा साक्षीदार बनलेला श्यामवर राय याला पोलिसांनी सर्वप्रथम अटक केली होती. पीटरच्या पहिल्या पत्नीचा मुलगा राहुल आणि शीना यांच्यामधील प्रेमसंबंध पसंत नसल्याने ही हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. मालमत्तेचा मुद्दाही यात आहे.

ल्ल आरोपनिश्चितीनंतर इंद्राणीने पीटरपासून घटस्फोट हवा असल्याचे न्यायालयाला सांगितले. तर आपल्या अशिलाला कौटुंबिक वादात गोवले जात आहे. ती निष्पाप असून त्यामुळेच तिला घटस्फोट हवा आहे, अशी माहिती तिच्या वकिलांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली. इंद्राणीला तिचे इच्छापत्र बदलायचे असून आता तिला तिच्या मालमत्तेचा काही वाटा इस्कॉन तसेच भायखळा येथील महिला कारागृहासाठी द्यायचा आहे, असेही तिच्या वकिलांनी सांगितले.