शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने वॉर्डन मंजुळा शेटय़ेच्या मृत्यूनंतर भायखळा कारागृहातील अन्य कैदी महिलांना भडकावल्याचा गुन्हा एकीकडे पोलिसांनी नोंदवलेला असताना कारागृह अधिकाऱ्यांनी आपल्यालाही मारहाण केल्याचा आरोप इंद्राणीने मंगळवारी केला. विशेष सीबीआय न्यायालयात एका अर्जाद्वारे इंद्राणीने हा आरोप केला असून न्यायालयानेही त्याची दखल घेतली आहे. एवढेच नव्हे, तर बुधवारी तिला न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश कारागृह प्रशासनाला दिले आहेत.

मंजुळा हिच्या मृत्यूनंतर महिला कैद्यांना भडकावल्याचा गुन्हा इंद्राणीवर नोंदवण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर आपण कारागृहात जाऊन तिची भेट घेतली. सुरुवातीला आपल्याला भेट नाकारण्यात आली. परंतु नंतर इंद्राणीला भेटू देण्यात आले. त्या वेळी कारागृह अधिकाऱ्यांकडून तिलाही मारहाण केल्याची तक्रार तिने आपल्याकडे केली. मारहाणीच्या जखमाही इंद्राणीने आपल्याला दाखवल्या. तिच्या डोक्यावर तसेच हातापायावर जखमा आहेत, असेही इंद्राणीची वकील गुंजन मंगला यांनी तिच्या वतीने अर्ज दाखल करताना न्यायालयाला सांगितले. कारागृह अधीक्षक आणि अन्य अधिकाऱ्यांनी  शिवीगाळ केल्याची तसेच मंजुळाच्या मृत्यूचा निषेध केल्याचा सूड म्हणून लैंगिक छळ करण्याची धमकी दिल्याचा आरोपही इंद्राणीने अर्जात केला आहे. हा सगळा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून देता यावा आणि कारागृह अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करता यावा म्हणून तिला न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश देण्याचीही गुंजन यांनी न्यायालयाकडे मागणी केली.

न्यायालयाने इंद्राणीची न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यावर तिला हजर करण्याचे आणि त्या वेळी तिचे म्हणणे ऐकण्याचे म्हटले. इंद्राणी ही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे तिचे म्हणणे न्यायालयाला ऐकावे लागेल, असे तिच्या वकिलांनी पटवून देण्याचा प्रयत्न केल्यावर अखेर विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश जे. सी. जगदाळे यांनी इंद्राणीच्या अर्जाची दखल घेतली. या प्रकरणी इंद्राणीला गुन्हा दाखल करायचा आहे का, अशी विचारणा तिच्या वकिलांकडे केली. त्यावर होकारार्थी उत्तर आल्यानंतर न्यायालयाने इंद्राणीला बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश कारागृह प्रशासनाला दिले.