आयएनएक्स इंडियाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणी हिने पूर्वाश्रमीचा पती व ड्रायव्हर यांच्या साह्य़ाने स्वतच्याच मुलीची- शीना बोराची (२४) हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शीना हिची तीन वर्षांपूर्वी हत्या झाली होती. तिचा अर्धवट जळालेला मृतदेह रायगडमधील गागोदे या गावानजीकच्या जंगलात फेकून देण्यात आला होता. शस्त्रास्त्र खरेदीप्रकरणात श्याम राय याला अटक झाल्यानंतर शीना बोरा हत्याप्रकरणाची माहिती उघड होऊ लागली.
पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी बुधवारी शीना बोरा हत्या प्रकरणाच्या तपासाचा तपशील सादर केला. शस्त्रास्त्रविक्रीसाठी एक जण वाकोला येथे येणार असल्याची माहिती खार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला. त्यात श्याम राय अलगद सापडला. त्याच्याकडे ९.६५ एमएमचे पिस्तूल पोलिसांना सापडले. हे पिस्तूल कोठून आले याची चौकशी केली असता श्यामने तीन वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्य़ाची कबुली दिली. मालकीण इंद्राणी मुखर्जीने त्यासाठी एक लाख रुपये दिले होते असे त्याने सांगितले. तसेच पैशांची चणचण भासू लागल्याने पिस्तूल विकायला काढल्याचे तो म्हणाला. श्यामच्या जबानीत इंद्राणीचे नाव आल्याने तपासाची चक्रे वेगाने फिरली. दोन महिने पोलीस श्यामने दिलेल्या माहितीचा तपास करत होते. त्यानंतर इंद्राणीला अटक करण्यात आली. इंद्राणीनेही पोलीस चौकशीत शीनाची हत्या पहिल्या पतीच्या सहकार्याने केल्याचा कबुलीजबाब दिला. तसेच शीना ही आपली बहीण नव्हे तर मुलगी होती, असा सनसनाटी खुलासाही केला.
हत्या कशी झाली..
२३ एप्रिल २०१२ रोजी इंद्राणीने शीनाचे वांद्रे येथील नॅशनल महाविद्यालयाजवळून अपहरण केले. त्यावेळी गाडीत माजी पती संजीव खन्ना व गाडीचालक श्याम राय होते. गाडीतच गळा आवळून शीनाची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह रायगडजवळील गागोदे गावाजवळील जंगलात फेकून दिला. मृतदेह फेकण्यापूर्वी त्याची ओळख पटू नये यासाठी पेट्रोल ओतून तो जाळून टाकला होता. दरम्यान, गावकऱ्यांना दरुगधी येत असल्याने त्यांनी पेण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह हस्तगत केला. तो अर्धवट जळालेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत होता. मृतदेहाची ओळख न पटल्याने पोलिसांनी त्याची ‘अज्ञात’ अशी नोंद करून विल्हेवाट लावली, पण डीएनए नमुने घेऊन ठेवले नव्हते.
हत्येमागील उद्दिष्ट अस्पष्ट..
मूळची आसामची असलेली इंद्राणी १९९६ मध्ये मुंबईत आली. २००२ मध्ये तिने तेव्हाचे आयएनएक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या पीटर मुखर्जी यांच्याशी लग्न केले. तेव्हा ती ३० वर्षांची होती. तिला पहिल्या पतीपासून मिखाईल व शीना ही दोन अपत्ये होती. शीनाला ती तिच्यासोबत मुंबईत घेऊन आली होती. तसेच पीटरशी ओळख करून देताना शीना आपली बहीण असल्याचे इंद्राणीने सांगितले होते. शीनाने तिचे पदवीचे शिक्षण सेंट झेवियर्स महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर ती रिलायन्स मेट्रोमध्ये साहाय्यक व्यवस्थापक पदावर रुजू झाली. दरम्यान, पीटर यांना पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा राहुल याच्याशी शीनाचे प्रेमसंबंध जुळले. त्यांचे प्रेमसंबंध इंद्राणीला मान्य नव्हते.
शीनाने राहुलशी लग्न केल्यास मालमत्तेचा वाटा द्यावा लागेल, अशी भीतीही तिला वाटत होती, तर शीनाने ‘राहुलशी लग्न करण्यास विरोध केला तर मी तुझी बहीण नसून मुलगी असल्याचे पीटरना सांगेन’, अशी धमकी इंद्राणीला दिली होती. आपले बिंग फुटू नये यासाठी इंद्राणीने शीनाची हत्या केली की, मालमत्तेतील वाटा द्यावा लागू नये म्हणून केली याबाबत अद्याप काहीही स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस दोन्ही शक्यता पडताळून पाहात आहेत.

‘क्लेशदायक प्रकार’
पीटर मुखर्जी यांची वरळी येथील त्यांच्या निवासस्थानी जबानी घेण्यात आली. तीत त्यांनी इंद्राणीने शीनाची ओळख ‘बहीण’ म्हणून करून दिल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, राहुलशी शीनाचे प्रेमसंबंध होते व ते लग्नही करणार होते. मात्र, इंद्राणीला हे सर्व मंजूर नव्हते. फेब्रुवारी, २०१२ पासून शीना कधी दिसली नाही. इंद्राणीने ती अमेरिकेत असल्याचे सांगितले. दरम्यानच्या काळात राहुलने माझ्याशी संबंध तोडल्याने त्यांच्याबद्दल फारसे काही समजले नाही. मात्र, इंद्राणीने आपल्याला एक मुलगी असल्याचे सत्य दडवून ठेवणे व तिची हत्या करणे या क्लेशदायक गोष्टी असल्याचे मुखर्जी यांनी नमूद केले.
‘खरे कारण पोलिसांनाच सांगेन’
आईने शीनाची हत्या का केली याचे खरे कारण मला माहीत आहे. इंद्राणीने गुन्हा कबूल केला नाही तर त्याबाबतची माहिती पोलिसांना देईन, असे शीनाचा भाऊ व इंद्राणीचा मुलगा मिखाईल बोरा याने स्पष्ट केले आहे. मिखाईल त्याच्या आजोबांजवळ गुवाहाटीत राहतो.

इंद्राणीच्या पहिल्या पतीला अटक
कोलकाता : इंद्राणीचा पहिला पती संजीव खन्ना याला बुधवारी कोलकात्यातून अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी कोलकाता पोलिसांच्या मदतीने संजीव खन्नाला मित्राच्या सदनिकेतून अटक केली. खन्ना यांना अलीपूर न्यायालयात हस्तांतरासाठी हजर करण्यात येणार आहे. यानंतर मुंबई पोलीस त्याला घेऊन जाऊ शकणार असल्याचे कोलकाता पोलिसांनी सांगितले.