तब्बल दोन दिवसांनी शुद्धीवर
शिना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जी रविवारी, ४८ तासांनी शुद्धीवर आल्या असून त्यांच्या जीवाला असलेला धोका टळल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी स्पष्ट केले. त्यांना अद्याप वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात येणार असल्याचेही लहाने यांनी सांगितले. दरम्यान, इंद्राणी मुखर्जी बेशुद्ध पडल्यानंतर तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्या काहीच हालचाल करत नसताना तातडीने डॉक्टरांना बोलावून त्यांची तपासणी करायची गरज होती. मात्र त्यात हलगर्जीपणा दाखवण्यात आल्याचेही समोर येत आहे.

नक्की वाचा: इंद्राणी मुखर्जीची प्रकृती स्थिर- डॉ. तात्याराव लहाने
उच्चभ्रू व्यक्तींचा समावेश असलेल्या शिना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी शुक्रवारी तुरुंगात बेशुद्ध पडल्या. त्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसांच्या उपचारांनंतर रविवारी इंद्राणी शुद्धीवर आल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. मात्र त्या अजूनही ग्लानीत असून त्यांना थोडेसे पाणी देण्यात आले आहे. त्यांच्या जीवाला असलेला धोका टळला आहे. पुढील २४ ते ४८ तास त्यांना निगराणीखाली ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडले जाणार असल्याचेही डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालांत तफावत आढळल्याबद्दल डॉ. लहाने यांना विचारले असता न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अहवाल सत्य आणि विश्वासार्ह असतात असे सांगितले. या अहवालांत निघालेल्या निष्पन्नानुसारच आम्ही इंद्राणी यांच्यावर उपचार करत आहोत आणि आमच्या उपचारांना त्यांचा प्रतिसाद मिळत आहे, असे डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले.