डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलच्या जमिनीचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाची त्याला लवकरच मान्यता मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
डॉ. आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर या महानिर्वाणदिनाच्या पाश्र्वभमीवर चेत्यभूमिच्या सुशोभिकरणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सह्य़ाद्री अतिथीगृहावर सुकाणू समितीची बैठक झाली. या बैठकीला सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, मुंबईचे पालक मंत्री जयंत पाटील, महिला व बालविकास मंत्री वर्षां गायकवाड, सामाजिक न्याय राज्यमंत्री सचिन अहिर, मुख्य सचिव जयंतकुमार बॉंठिया, महापलिका आयुक्त सीताराम कुंटे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, समितीचे सदस्य आनंदराज आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, आनंदराव खरात आदी सदस्य उपस्थित होते.
चैत्यभूमिच्या सुशोभिकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. भारतीय बौद्ध महासभेने दुसऱ्या टप्प्याचे काम करण्याची तयारी दर्शविली आहे. या संदर्भात पुढील कामासाठी सीआरझेडशी संबंधित नव्याने परवानग्या घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
 बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जमीन हस्तांतरणाचा प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यावर आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलची जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, या संदर्भात आपले केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आनंद शर्मा यांच्याशी चर्चा झाली असून त्यांची लवकरच मान्यता मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
या मिलच्या जागेवर आंबेडक स्मारक उभारण्यास शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.