पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या आदेशानुसार इंदू मिलची संपूर्ण जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठीच दिली जाईल, त्यासंबंधीच्या जमीन हस्तांतराचा निर्णय ६ डिसेंबरपूर्वी घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले व रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांना दिले.
राज्य सरकारने इंदू मिलचा प्रश्न आता आणखी फार काळ चिघळत ठेवू नये, जमीन हस्तांतराचा ५ डिसेंबर पूर्वी निर्णय झाला नाही तर ६ डिसेंबरला आरपीआयचे कार्यकर्ते इंदू मिलचा ताबा घेतील असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे. आनंदराज आंबेडकर यांनीही सरकारने आंबेडकरी जनतेच्या उद्रेकाची वाट पाहू नये, निर्णय लवकर जाहीर करावा, असे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी मंत्रालयात इंदू मिलच्या प्रश्नावर रामदास आठवले व आनंदराज आंबेडकर यांच्यासमवेत स्वतंत्र चर्चा केली.  इंदू मिलच्या संपूर्ण साडे बारा एकर जागेवर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यास पंतप्रधानांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. पर्यावरण खात्याने मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचे काही प्रश्न आहेत, तेही सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
जमीन हस्तांतरणाचा व आंबेडकर स्मारकाचा निर्णय लवकरात लवकर घेण्याचा आपला प्रयत्न आहे, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती नंतर रामदास आठवले यांनी पत्रकारांना दिली.