राजकारणी वा मंत्र्यांच्या आशीर्वादाने वर्षांनुवर्षे मुंबई- पुण्यात त्यातही मलईदार खात्यांमध्ये ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना आता थेट मराठवाडा- विदर्भात सक्तीच्या सेवेवर धाडण्याचा निर्णय मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात महसूल विभागातील तब्बल १६ अधिकाऱ्यांना मराठवाडय़ात धाडण्यात आले आहे.
 मुंबई- पुण्याच्या बाहेर जाण्यास महसूल अधिकारी नेहमीच नाखूश असतात. एखाद्याची बदली झालीच तर आमदार, खासदार वा मंत्र्यांच्या दबावाने ही बदली रद्द करून घेतली जाते. अगदी मुंबईत जागा नसेल तर अन्य विभाग, महापालिका वा महामंडळात प्रतिनियुक्तीवर वर्णी लावून याच भागात ठाण मांडून बसणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर मराठवाडा- विदर्भासारख्या भागात अधिकाऱ्यांच्या कमतेरतेमुळे लोकांची कामेच होत नाहीत. विधिमंडळात झालेल्या चर्चेदरम्यान मराठवाडय़ात अधिकाऱ्यांचीही टंचाई असल्याची बाब मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणण्यात आली. त्यावर मुंबई- पुण्यात वर्षांनुवर्षे ठाण मांडलेलया अधिकाऱ्यांची यादीच तयार करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनास दिले आहेत. अशा सर्व अधिकाऱ्यांना ग्रामीण भागात पाठविण्याचे आदेश देण्यात आले असून बदलीच्या ठिकाणी त्वरित रूजू न होणाऱ्या किंवा राजकीय दबाव आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.