तक्रारदाराला १० हजार नुकसानभरपाई देण्याचे आदेश

मुंबई महापालिकेत सध्या गाजत असलेल्या नालेसफाई घोटाळ्याशी संबंधित माहिती जाणूनबुजून लपवून ठेवल्याप्रकरणी महापालिकेच्या चौकशी अधिकाऱ्यावरच ठपका ठेवण्यात आला आहे. माहिती अधिकाराच्या माध्यमातून हे प्रकरण बाहेर आणू पाहणाऱ्या नागरिकास माहिती न देता उलट त्याला जाणूनबुजून त्रास दिल्याप्रकरणी चौकशी अधिकाऱ्याच्या वेतनातून १० हजार रुपये कापून घ्यावेत आणि ते तक्रारदारास द्यावेत असे आदेश राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

शहरातील नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचे लक्षात येताच गोवंडी भागातील बाळासाहेब केंजळे यांनी माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून शहरातील काही महत्त्वाच्या नाल्यांच्या साफसफाईच्या कामांची माहिती महापालिकेच्या मुख्य चौकशी अधिकाऱ्याकडे मागितली होती. मात्र त्यांनी प्रथम ही माहिती देण्याबाबत टाळाटाळ केली. त्यानंतर केंजळे यांनी वरिष्ठांकडे दाद मागितली तेव्हा हव्या असलेल्या माहितीसाठी १९१० रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार केंजळे यांनी ही रक्कम जमा केल्यानंतरही त्यांना अपेक्षित माहिती देण्यात आली नाही. उलट त्यांना वारंवार हेलपाटे घालायला लावून नाहक त्रास दिल्याप्रकरणी तक्रारदार केंजळे यांना १० हजार रुपयांची नुकासनभरपाई द्यावी. तसेच त्यांनी माहितीसाठी भरलेले १९१० रुपये परत देऊन ५०० पानांपर्यंतची माहिती मोफत द्यावी असेही आदेश माहिती आयुक्तांनी दिले आहेत