एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याची उकल करण्यासाठी पोलिसांना खबरी हा महत्त्वाचा दुवा होता. परंतु खबऱ्यांना पैशाची रसद पुरविण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांना आता फक्त मोबाइलचा ठावठिकाणा हा एकच दुवा तपासासाठी राहिला आहे. पोलिसांकडून हवी तशी बिदागी मिळत नसल्यामुळे खबरीही दिवसेंदिवस पोलिसांपासून दुरावत चालले आहेत. चांगल्या खबरीसाठी आजही पोलिसांचा ‘सिक्रेट फंड’ उपलब्ध आहे. परंतु चांगली खबर देणारा खबरीच सध्या पोलिसांकडे नसल्याचे बोलले जाते.

आपल्या हद्दीतील दारू अड्डे शोधून काढून त्याविरुद्ध कारवाई करणे हा मालवणी दारूकांडानंतर प्रत्येक पोलीस ठाण्याचा एककलमी कार्यक्रम झाला आहे. परंतु दारू अड्डय़ांची माहिती मिळविण्यासाठी खबऱ्यांशिवाय पर्याय नाही, हे आता पोलिसांच्या लक्षात येऊ लागले आहे. परंतु गेल्या काही वर्षांत खबऱ्यांना दूर करण्याच्या पद्धतीमुळे आता खबरी जवळ येण्यास तयार नाहीत. नव्याने येणारे खबरे खूपच अपेक्षा घेऊन येत आहेत. ती पूर्ण करणे शक्य नाही, असे अनेक पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु छोटी आमिषे दाखवीत पोलिसांनी पुन्हा खबऱ्यांना जवळ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता खबरीही हातचे राखून वागत असल्याचा अनुभव या पोलिसांना येत आहे.

गुन्हे अन्वेषण विभागाची मदार संपूर्णपणे खबऱ्यांवरच अवलंबून आहे. गुन्हे अन्वेषण विभागातील काही पोलीस निरीक्षक हे बढतीने आता पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याकडे खबऱ्यांची फौज आहे. गुन्ह्य़ांची उकल करण्यासाठी खबऱ्यांची फौज बाळगणे आवश्यक असल्याचे मत या वरिष्ठ निरीक्षकांनी व्यक्त केले असले, तरी या खबऱ्यांना बिदागी देण्यासाठी पैसा कुठून आणायचा, असा सवाल हे पोलीस करीत आहेत. पोलीस अधिकाऱ्याला चांगल्या खबऱ्याशिवाय काम करता येणे शक्यच नाही, असेही या निरीक्षकांचे म्हणणे आहे.

कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त असलेले देवेन भारती हे गुन्हे अन्वेषण विभागात होते. त्यामुळे पोलीस ठाण्यांच्या पातळीवर खबरी नाहीत, हे त्यांना मान्य नाही. त्यामुळेच त्यांनी पोलीस ठाण्याच्या पातळीवर गुन्हे अन्वेषण विभागाच्या धर्तीवर पोलिसांचे पथक करण्याचे ठरविले आहे. हे पथक पोलीस ठाण्यातील कुठलीही डय़ुटी करणार नाही. मात्र गुन्ह्य़ाची उकल करण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व करील, असे भारती यांचे म्हणणे आहे.

 

चांगली खबर मिळविण्यासाठी पोलिसांचा सिक्रेट फंड नेहमीच उपलब्ध आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी आपले खबऱ्यांचे जाळे वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील असले पाहिजे. खबऱ्यांची संख्या रोडावल्याचे लक्षण पोलीस दलासाठी ठीक नाही

-राकेश मारिया, पोलीस आयुक्त