पोलिसांनी तज्ज्ञांकडून अहवाल मागवला; वास्तुविशारद फरार

घाटकोपरची सिद्धीसाई इमारत का व कशी पडली हे जाणून घेण्यासाठी पार्कसाईट पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेसह ‘आयआयटी’तील तज्ज्ञांकडून अहवाल मागवला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी वेधशाळेशी संपर्क साधून इमारत खचण्या-कोसळण्यासारखे हवामान होते का, अशीही माहिती मागवली आहे. दरम्यान, दुर्घटनेपासून मुख्य आरोपी सुनील शितप याचा वास्तुविशारद पसार आहे. पोलीस कोठडीत असलेला शितप सर्व आरोप वास्तुविशारदावर ढकलण्याचा प्रयत्न करत आहे.

तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार शितपने तळमजल्यावरील मूळ रचना उद्ध्वस्त केल्याने सिद्धीसाई इमारत पडली, अशी माहिती प्राथमिक चौकशी व तपासातून पुढे आली आहे. मात्र कोठडीत असलेला शितप तपासाला सहकार्य करत नाही. त्याने दिलेली माहिती विसंगत आहे. त्यामुळे वास्तुविशारद रणजीत आगळे याचा शोध सुरू केला आहे. त्याच्या चौकशीतून तळमजल्यावर नेमके काय काम सुरू होते, मूळ रचनेत का बदल केले गेले, कंत्राटदार कोण होता ही माहिती समोर येऊ शकेल.

दुसरीकडे पार्कसाईट पोलिसांनी कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांना बोलावून सिद्धीसाईच्या ढिगाऱ्यातील सिमेंट, लोखंडी तारा आदी वस्तूंचे नमुने चाचणीसाठी धाडले आहेत. या चाचणीतून बांधकाम भक्कम होते का, इमारत धोकादायक होती का, ती तळमजल्यावरील फेरबदलांमुळे पडली का हे स्पष्ट होणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. प्रयोगशाळेसोबतच पवई येथील आयआयटीतील तज्ज्ञांकडूनही अशाच प्रकारचा अहवाल मागवण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मंगळवारी दुर्घटना घडली. त्या दिवशी व त्याआधी हवामान म्हणजेच परिसरात पडलेल्या पावसाची नोंद, तेवढय़ा पावसामुळे एखादी इमारत कोसळू शकेल का याची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलीस इमारतीतल्या रहिवाशांसोबत आसपासच्या अन्य इमारती, चाळींमधील रहिवाशांचे जबाब नोंदवून घेत आहेत. त्यातून सिद्धीसाईच्या तळमजल्यावर महिनाभरापासून काम सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.

  • पोलिसांनी महापालिकेकडे पत्रव्यवहार करून सिद्धीसाई इमारतीतील रहिवाशांनी शितपविरोधात काही तक्रारी केल्या होत्या का, असतील तर त्यावर काय कारवाई केली, शितपने फेरबदल करण्यासाठी परवनगी घेतली होती का अशी माहिती देण्यास सांगितले आहे.
  • पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त लखमी गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.