‘महानंद’च्या संचालक मंडळाने २००४ ते २०१४ या १० वर्षांत केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याचा निर्णय दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी घेतला आहे. सिंचन क्षेत्रातील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील ‘महानंद’ची चौकशी आता केली जाणार आहे.

राज्य दूध वितरक आणि वाहतूक संघाचे अध्यक्ष नाईक यांच्या तक्रारीवरून खडसे यांनी या चौकशीचे आदेश दिले आहेत. महानंदमध्ये २००५ पूर्वी सुमारे ९० कोटी रुपयांची अनियमितता झाली असल्याची तक्रार असून त्याचीही चौकशी होणार आहे. महानंदमधील गैरव्यवहाराबाबत चौकशी होऊन आरोपपत्र दाखल झाले आहे. नव्याने चौकशी झाल्यावर पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे खडसे यांनी सांगितले.
दूध भुकटी, टेट्रोफिनो प्रकल्पाच्या किमतीत वाढ, संचालकांवर सुवर्णमुद्रांची उधळण यासह अनेक बाबींविषयी तक्रारी आहेत. राज्यात नवीन सरकार आल्यावर महानंदच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावून देण्यात आले आहे. त्यामुळे अध्यक्षा वैशाली नागवडेंसह विदर्भातील ११ संचालकांनी राजीनामेही दिले आहेत. ते नियमानुसार असतील, तर स्वीकारण्याच्या सूचना एकनाथ खडसे यांनी व्यवस्थापकीय संचालकांना दिल्या आहेत.