देखभालीचा खर्च परवडेनासा झाल्यामुळे भंगारात काढाव्या लागलेल्या युद्धनौका विक्रांतवरील सामग्रीतूनच नौदल मुख्यालयासमोरच्या वाहतूक बेटावर स्मारक उभारले जाण्याची शक्यता आहे. विक्रांत युद्धनौकेवरील दोन टन सामग्री विकत घेतलेल्या सेवानिवृत्त कमोडर यांनी पालिकेला याबाबत मदत करण्याची विनंती केली होती. त्यानुसार पालिका गटनेत्यांच्या बैठकीत सोमवारी स्मारकाला सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आयएनएस विक्रांत ही भारताची पहिली विमानवाहू युद्धनौका. या नौकेवर पायलट म्हणून काम करीत असताना कमोडर एम. भादा यांनी १९७१ च्या बांगलादेशी युद्धात उत्तम कामगिरी बजावली होती. त्यामुळे ही नौका मोडीत निघाली तेव्हा एम. भादा यांनी त्यावरील दोन टन सामग्री विकत घेतली. नामवंत धातू शिल्पकार अर्झान खंबाटा यांच्या सहकार्याने या सामुग्रीतून दक्षिण मुंबईत नौदलाच्या मुख्यालयाजवळ वाहतूक बेटावर स्मारक उभारण्याचा कमोडोर भादा यांचा मानस आहे. हे स्मारक उभारण्यासाठी त्यांनी चार पर्यायी जागा सुचवल्या असून शिल्प उभारणीचा खर्चही ‘सीएसआर’ अर्थात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीअंतर्गत केला जाईल.