देशात नवे सरकार आल्यापासून स्वदेशी शस्त्रास्त्रनिर्मितीला चालना मिळाली असून या क्षेत्रात परदेशांवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर आहे. परदेशांकडून शस्त्रास्त्रे खरेदी करणारे नौदल ही प्रतिमा पुसून देशात शस्त्रे तयार करणारे स्वयंपूर्ण नौदल असे स्थित्यंतर करणे हे नजीकच्या भविष्यकाळातील उद्दिष्ट असल्याचे नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल आर. के. धवन यांनी सोमवारी मुंबईत सांगितले.
येथील माझगाव गोदीत बांधणी करण्यात आलेल्या  विनाशिकेचे धवन यांच्या पत्नी मीनू यांच्या हस्ते जलावतरण करण्यात आले.
देशात युद्धनौका बनवण्याच्या प्रयत्नांना ५० वर्षांपूर्वी सुरुवात झाली. तेव्हापासून आजतागायत मोठी मजल मारण्यात आली आहे. सध्या देशातील सरकारी आणि खासगी गोदींमध्ये विविध प्रकारच्या ४८ लढाऊ नौकांची बांधणी सुरू आहे.  युद्धनौका बांधणीत नौकेचा सांगाडा, त्याला गती आणि ऊर्जा  देणारी यंत्रणा आणि त्यावरील शस्त्रसंभार अशा तीन क्षेत्रात काम होत असते. त्यापैकी पहिल्या क्षेत्रात भारताने आजवर ९० टक्के स्वयंपूर्णता मिळवली आहे. दुसऱ्या क्षेत्रात ६० टक्के स्वयंपूर्णता आली आहे. तिसऱ्या क्षेत्रात मात्र ३० ते ४० टक्के आत्मनिर्भरता आहे. या क्षेत्राचे अधिकाधिक वेगाने स्वदेशीकरण करणे हे आगामी काळातील उद्दिष्ट आहे, असे धवन यांनी सांगितले. त्यासाठी विविध गोदी, संरक्षण उत्पादन आणि संरक्षण संस्था (डीआरडीओ) तसेच खासगी उद्योगक्षेत्र यांच्यात अधिक ताळमेळ साधून काम केले जात आहे. आयएनएस विशाखापट्टणमसाठी वापरलेले खास पोलाद देशातच उत्पादित केले आहे. या नौकेचे ६५ टक्के भाग स्वदेशी आहेत, तर गॅस टर्बाईन आणि शाफ्ट या बाबतीत रशियाचे सहकार्य घेतले आहे, असे ते म्हणाले. ही युद्धनौका २०१८ साली नौदलात दाखल होणे अपेक्षित
आहे.
 धवन यांनी नौदलासंबंधी अन्य विषयांचाही परामर्श घेतला. रशियाकडून नुकत्याच घेऊन नौदलात दाखल झालेल्या आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू नौकेवर स्वसंरक्षणार्थ क्षेपणास्त्रप्रणाली नसल्याची माहिती काही दिवसांपूर्वी जाहीर झाली होती. ही उणीव लवकरच भरून काढणार असल्याचे धवन यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी डॉर्निअर या टेहळणी विमानाला अपघात झाला होता. त्या प्रकरणी अद्याप अधिकृत चौकशी समिती स्थापन केली नसली तरी तपास सुरू आहे, असे ते म्हणाले.
महिलांना नौदलात प्रत्यक्ष लढाऊ कामगिरी देण्याच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की महिला नौदलाच्या अन्य शाखांमध्ये प्रभावी कामगिरी करत आहेत. त्यांची क्षमता, देशभक्ती आणि समर्पणवृत्ती यावर शंका नाही. पण प्रश्न देशाची मानसिकता तयार झाली आहे का आणि महिलांना सर्वोत्तम संधी व कामाचे वातावरण देण्यास आपली तयारी पूर्ण झाली आहे हा आहे असे धवन यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तान-चीन सहकार्य चिंतेची बाब
चीन आणि पाकिस्तान यांचे वाढते नौदल सहकार्य, चाचेगिरी, सागरी दहशतवाद या चिंतेच्या बाबी असून त्यावर भारतीय नौदल पूर्ण लक्ष ठेवून आहे आणि त्यांना तोंड देण्यासाठी प्रभावी उपाययोजना करत असल्याचे त्यांनी सांगितले.