दहिसर, बोरिवली, मागाठणे परिसरातील विधवा, परित्यक्ता आणि घटस्फोटितांच्या मदतीसाठी दिली जाणारी विविध यंत्रे प्रशासनाने शिवसेना आमदाराच्या शिफारशीनुसार एकाच नगरसेवकाला उपलब्ध केल्यामुळे आर-उत्तर आणि आर-मध्य प्रभाग समितीमध्ये ‘असुरक्षित’ नगरसेविकांनी गोंधळ घातला. तर पालिका सभागृहाच्या मंजुरीनंतर चौकाला दिलेले प्रमोद महाजन यांचे नाव बदलण्याचा घाट घालणाऱ्या आमदारावर भाजप नगरसेविकांनी तोंडसुख घेतले.
नगरसेवकांच्या कामांमध्ये ढवळाढवळ करीत श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात असलेल्या आमदाराचा निषेध करीत प्रभाग समितीची बैठक तहकूब करण्यात आली. पालिकेच्या महिला आणि बाल कल्याण विभागामार्फत विधवा, परित्यक्ता आणि घटस्फोटित महिलांना शिवणकाम, पापड, शेवया निर्मिती यंत्र दिले जाते. यंत्रे मिळावीत यासाठी प्रभागातील प्रशासकीय अधिकाऱ्याला पत्रे पाठविली होती. परंतु केवळ नगरसेवक उदेश पाटेकर यांचे पत्र महापालिका मुख्यालयापर्यंत पोहोचले आणि त्यांना ही यंत्रे मिळाली. गेल्या वर्षी उदेश पाटेकर यांनी १५०० यंत्राचे वाटप केले होते. या प्रकाराला भाजप नगरसेविका मनीषा चौधरी यांनी गुरुवारी प्रभाग समितीच्या बैठकीत वाचा फोडली. नगरसेविका शीतल म्हात्रे, आसावरी पाटील, बीना दोशी, संध्या दोषी, नगरसेवक प्रकाश दरेकर यांनी प्रशासन आणि घोसाळकर यांच्यावर टीकेची झोड उठविली.
‘प्रमोद महाजन’ यांच्याऐवजी ‘एक्सर गाव चौक’
बोरिवली येथील देवीदास रस्ता, देवकीनगर रस्ता व आय.सी. कॉलनी येथून येणाऱ्या रस्त्यामुळे निर्माण झालेल्या चौकास भाजप नेते प्रमोद महाजन यांचे नाव देण्यात आले आहे. त्याचा प्रस्ताव पालिका सभागृहाने मंजूर केल्यानंतर फेब्रुवारी २०१४ मध्ये नामकरणाचा कार्यक्रम पार पडला. आता या चौकाचे ‘एक्सर गाव चौक’ असे नामकरण करण्याचा हट्ट विनोद घोसाळकर यांनी धरला आहे. तसे पत्रही त्यांनी प्रभाग कार्यालयाकडे सादर केले आहे.