परिवहनमंत्र्यांचा निर्णय; कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ आणि ‘गाव तिथे एसटी’ अशी प्रवाशांभिमुख सेवा देणाऱ्या एसटीने कर्मचाऱ्यांच्या कुटंबांना मोठा दिलासा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सहा लाख रुपयांचे विमाकवच देण्याची घोषणा परिवहनमंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. एसटीच्या सेवेत असताना कर्मचाऱ्याचे निधन झाले, तर त्यांच्या कुटुंबीयांना आधार म्हणून कर्मचारी ठेव विमा योजनेअंतर्गत एसटीकडून ६.१५ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन करार गेल्या वर्षभरापासून रखडला आहे. या करारासाठीच्या बैठकांमधून काहीच तोडगा निघत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. या पाश्र्वभूमीवर झालेल्या एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांना विमाकवच देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. एसटीच्या सेवेत असताना मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अतिरिक्त उपदान म्हणजेच कर्मचारी ठेव विमा योजनेअंतर्गत एसटीकडून ६.१५ लाख रुपये देण्याची घोषणा दिवाकर रावते यांनी केली.

याआधी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना ३.६५ लाख रुपये अतिरिक्त उपदान रक्कम म्हणून दिले जात होते.  ही योजना २४ मेपासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होणार आहे. विशेष म्हणजे एसटीतील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतन श्रेणी तीनवरून एक वर्ष करण्याचा निर्णयही परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी घेतला होता.