माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी पदाचा त्याग करीत राजकीय पक्षात प्रवेश करण्याचे ठरविल्यानंतरही त्यांच्या या महत्त्वाकांक्षेची कानोकान खबर स्कॉटलंड यार्डशी तुलना होणाऱ्या मुंबई पोलिसांच्या गुप्तचर विभागाला लागली नाही. इतकेच नव्हे तर जानेवारी महिन्यांतच शासनाला पत्र पाठवून आपल्याला लवकर मुक्त करण्याची विनंती केली होती, या डॉ. सिंग यांच्या दाव्यामुळे गुप्तचर विभागाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भल्याभल्यांची माहिती काढणाऱ्या गुप्तचर विभागाला आपल्याच दलातील एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याच्या राजकीय महत्त्वाकांक्षेची बातमी लागू नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्याच्या गुप्तचर विभागाकडून दररोज मुख्यमंत्र्यांना राजकीय घडामोडी तसेच इतर पक्षीय बाबींची माहिती दिली जाते. अतिरिक्त महासंचालक दर्जाचा अधिकारी या पदावर असतो. मात्र या विभागालाही डॉ. सिंग यांच्या राजकीय हालचालींची माहिती मिळाली नाही, असे स्पष्ट झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी आपणच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्याला मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या जबाबदारीतून लवकर मुक्त करा, अशी विनंती केल्याचे डॉ. सिंग यांनी सांगितल्यानंतर त्यातील गांभीर्य अधिकच वाढले आहे. एक अतिवरिष्ठ अधिकारी महत्त्वाचे पद सोडून जाण्याचे लेखी पत्र देतो आणि त्यामागील नेमके कारण शोधून काढण्याचा प्रयत्नही केला जात नाही, यावरून गुप्तचर विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. एखादा आयपीएस अधिकारी आपली राजकीय पोळी भाजून घेऊन नंतर आरामात संबंधित पक्षात प्रवेश करू शकतो, असा संदेश या निमित्ताने गेल्याचे काही आयपीएस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. डॉ. सिंग यांची राजकीय महत्त्वाकांक्षा कळल्यावर लगेचच त्यांना पदमुक्त करणे आवश्यक होते, याकडेही या अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. बैठका असल्याचे सांगून दिल्लीत जाणाऱ्या डॉ. सिंग यांच्या राजकीय हालचालींची कुणकुण लागू नये, याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.