स्मार्टफोन हाती आल्यानंतर इंटरनेट वापरासंदर्भातले अनेक संदर्भ बदलले आहेत आणि हल्लीची तरुणाई इंटरनेटसाठी मोबाइलचाच सर्वाधिक वापर करते, असे निरीक्षण लोकसत्ता ‘व्हिवा’साठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले. इंटरनेटचा वापर प्रामुख्याने एकमेकांशी संवाद साधण्यासाठी होतो, त्या खालोखाल सोशल नेटवर्किंगसाठी आणि मनोरंजनासाठी तरुणाई इंटरनेट वापरते, हेदेखील यातून स्पष्ट झाले.
मुंबई-पुण्याची तरुणाई इंटरनेटकडे ‘संवादाचे माध्यम’ म्हणून पाहत असल्याचे चित्र समोर आले. इंटरनेटचा सर्वाधिक वापर इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपसाठी (आयएम)म्हणजेच चॅटिंग अ‍ॅप्ससाठी केला जातो, असे यातून दिसले. आयएम अ‍ॅप्सच्या खालोखाल इंटरनेटचा वापर सोशल नेटवर्किंगसाठी केला जातो. सर्वेक्षणातील ९४ टक्के तरुणाई अशा संवादासाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरते. मोबाइलवरून संपर्क साधून बोलण्यासाठी किंवा एसएमएस पाठवण्याऐवजी थेट समोरच्याशी चॅट करण्यास तरुणाई पसंती देत असल्याचे चित्र समोर आले आहे. इंटरनेटचा वापर सोशल नेटवर्किंग साइट्ससाठीदेखील तरुणाई करते. या तुलनेत माहिती मिळवणे, संशोधन किंवा ऑनलाइन शॉपिंग करणे यासाठी इंटरनेटचा वापर तरुणांमध्ये अजूनही कमी आहे. ऑनलाइन गेम खेळण्यासाठीदेखील इंटरनेटचा वापर केला जातो. मुलांच्या बरोबरीने मुलीदेखील असे ऑनलाइन गेम्स खेळण्यात आघाडीवर आहेत. अर्थात याच कारणाने तरुणांना इंटरनेट वापरण्यासाठी संगणक, टॅबलेटपेक्षा मोबाइलच जवळचा वाटत असल्याचे चित्रही या सर्वेक्षणातून समोर आले. दिवसभराच्या भटकंतीमध्ये खिशात मावणारा मोबाइल तरुणांना जास्त प्रिय आहे. गेल्या काही महिन्यांपासून मोबाइल कंपन्या नेटपॅकच्या दरामध्येही सतत वाढ करत आहेत. त्यामुळे मॉल किंवा कॉफी शॉप्समध्ये उपलब्ध वाय-फाय सुविधेचा वापर करण्याकडे तरुणांचा कल अधिक आहे.
(या सर्वेक्षणातील आकडेवारी आणि त्यातून समोर आलेली निरीक्षणे यांची संपूर्ण माहिती आजच्या ‘व्हिवा’ पुरवणीमध्ये.)

-‘इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया’तर्फे ऑक्टोबर महिन्यात करण्यात आलेल्या पाहणीनुसार, देशात मुंबईमध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजेच तब्बल १.६४ कोटी आहे.

-या पाहणीमध्ये पुण्याचा चौथा क्रमांक आहे. १५ ते २५ या वयोगटातील तरुणाई इंटरनेट वापरते म्हणजे नेमके काय करते, हे जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले.

‘व्हिवा’मध्ये वाचा:

नेट लावून…

इन्स्टंट मेसेंजर्स

पुराणातली वांगी

देव झाले सुपरहिरो!

ऑनलाईन मेन्यूकार्ड

‘त्या’ काही वेबसाईट्स

जैसी जिसकी सोच..

लाँग कुर्ता पुन्हा फॉर्मात

‘यूटय़ूब’वरची सुपरवुमन

व्हिवा दिवा: चैताली शितूत