मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याची खटल्यातील सहआरोपी अबू जुंदाल याच्या वकिलांना उलटतपासणी करायची आहे. त्यासाठी चार दिवस लागणार असल्याची माहिती त्यांनी सोमवारी विशेष न्यायालयाला दिली. त्यानंतर न्यायालयाने विशेष सरकारी वकिलांना याबाबत अमेरिकेशी संपर्क साधून त्यासाठीच्या तारखा निश्चित करण्याचे निर्देश दिले.

सध्या अमेरिकेतील कारागृहात ३५ वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या हेडलीला २६/११च्या खटल्यात आरोपी बनवण्यात आल्यावर त्याने माफीचा साक्षीदार करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. तसेच हल्ल्याचा कट कसा, कुठे आणि कुणी शिजवला याची माहिती देण्यास सरकारी पक्षाला आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर ८ ते १३ जानेवारी या दरम्यान विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी त्याची सरतपासणी घेतली. सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळेस जुंदालचे वकील वहाब खान यांनी हेडलीच्या उलटतपासणीला चार दिवस लागतील, असे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने अमेरिकन यंत्रणांशी संबंध साधून याबाबत माहिती देण्याचे आणि उलटतपासणीच्या तारखा निश्चित करण्याचे आदेश निकम यांना दिले. तारखा निश्चित झाल्यानंतर त्याची माहिती २५ फेब्रुवारी रोजी सादर करण्याचेही न्यायालयाने या वेळेस स्पष्ट केले.