आयओएस ८ ही आयफोन ४एस पासून पुढच्या सर्व व्हर्जन्सना अद्ययावत करता येत आहे. पण या सर्वामध्ये एक अडचण सर्वानाच सतावते आहे ती म्हणजे ही ऑपरेटिंग सिस्टिम अद्ययावत करण्यासाठी फोनमध्ये ४.६ जीबीची जागा असणे आवश्यक आहे. ही जागा नसेल तर ही ऑपरेटिंग सिस्टिम अद्ययावत करण्यापूर्वी ती जागा निर्माण करावी लागत आहे. अ‍ॅपलने ९ सप्टेंबर रोजी केलेल्या लॉन्चमध्ये आयओएस ८ची झलक सर्वाना पाहायला मिळाली. या ओएसमध्ये असलेले विविध फिचर्स पाहता ती अद्ययावत करून घेणे सर्वानाच फायद्याचे ठरणार आहे. पण अनेकांना यात जागेची अडचण भासू लागली. कारण ही ओएस अद्ययावत करण्यासाठी फोनमध्ये किमान ४.६ जीबीची जागा आवश्यक असल्याचा संदेश येतो. यामुळे फोनमध्ये जागा निर्माण करून ऑपरेटिंग सिस्टिम अद्ययावत केल्यावर १६ जीबीचा आयफोनची स्पेस एकदम कमी होऊन ती ११ जीबी होते. आयपॅडमध्येतर ही ओएस अपग्रेड करण्यासाठी सहा जीबीची जागा लागते. यामुळे अ‍ॅपल प्रेमींमध्ये याबाबत नाराजीचे वातावरण पसरले आहे. अ‍ॅपलच्या अधिकृत संकेतस्थळावरील सपोर्ट विभागातही यावरील चर्चेस ऊत आला आहे.