दाऊदची पत्नी महजबीं शेख मागील वर्षी माझ्या कुटुंबाला दुबईत भेटली होती, त्यावेळी तिच्याशी फोनवर बोलणे झाले होते. अशी कबुली इकबाल कासकरने पोलिसांना चौकशीदरम्यान दिली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातील ट्विट केले आहे. पोलिसांनी इकबाल कासकरला अटक केल्यापासून दाऊद आणि त्याच्या कुटुंबाची माहिती पोलीस त्याच्याकडून मिळवत आहेत. महजबीं शेख फोनवरून काही काळ संपर्कात होती असेही कासकरने म्हटले आहे.

एवढेच नाही तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदच्या कराचीतील चार घरांचे पत्तेही इकबालने त्यांना दिले आहेत. दाऊद, त्याचा भाऊ अनिस आणि त्यांच्या टोळीतील खास माणूस छोटा शकील हे सगळेजण कराचीतील उच्चभ्रू परिसरात राहतात. अनिस इब्राहिम ईद असताना कुटुंबियांना मुंबईत फोन करतो असेही इकबालने चौकशीदरम्यान सांगितले.

तपास अधिकाऱ्यांनी इकबालला दाऊदच्या आजारपणाबाबत विचारले असता, दाऊदला कोणताही आजार झालेला नाही. तसेच दाऊद पाकिस्तानातच वास्तव्यास आहे असेही स्पष्ट केले. माझा एक नातेवाईक नाशिकमधे आहे आणि तेथील गुन्हेगारीमध्ये त्याचा सहभाग आहे असेही इकबालने म्हटले आहे. इकबालच्या या नातेवाईकाचा आम्ही शोध घेतो आहोत आणि लवकरच त्याला अटक करू असेही ठाणे पोलिसांनी म्हटले.