दहशतवादी कारवायांना निधी उपलब्ध व्हावा यासाठी जनूद-ऊल-खलिफा-हिंद या भारतातील आयसिसशी संलग्न असलेल्या संघटनेने बॉलीवूडमधील अभिनेत्यांकडून खंडणी वसूल करण्याचा विचार सुरू केला आहे. शस्त्रास्त्रे मिळविण्यासाठी नक्षलवाद्यांची मदत घेण्याची सूचना फेटाळण्यात आली आहे.

या संघटनेच्या रिझवान नवाझुद्दीन ऊर्फ खलिद आणि मुदब्बीर शेख या दोन खतरनाक दहशतवाद्यांना सुरक्षा यंत्रणांनी पकडले आणि त्यानंतर त्यांची चौकशी केली असता वरील बाब उघडकीस आली, असे सूत्रांनी सांगितले. रिझवान (१९) हा या मोहिमेचा म्होरक्या होता. लखनऊमध्ये सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या बैठकीत बॉलीवूड अभिनेत्यांना लक्ष्य करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती, असे रिझवानने चौकशीदरम्यान सांगितल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तथापि, ही संघटना संपूर्ण योजना आखण्यापूर्वीच सुरक्षा यंत्रणांनी देशपातळीवर त्यांच्या ऑनलाइन कारवायांवर लक्ष ठेवले होते आणि राष्ट्रीय तपास यंत्रणांनी आयसिसबद्दल सहानुभूती असलेल्या २३ जणांना अटक केली. रिझवान याने संघ परिवारातील नेते, सरसंघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल आणि प्रवीण तोगडिया यांच्यावर हल्ले करण्याचे ठरविले होते.

रिझवान याचे दोन चुलते लष्करात असून त्याने मेरठमधील लष्कराच्या तळावर हल्ला करण्याबाबतही चर्चा केली होती. इंटरनेट सर्फिग करताना  दहशतवादी विचारसरणीच्या जवळ गेल्याचे रिझवान याने मान्य केले.