बारावीच्या वेळापत्रकाबाबत पालकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी राज्य शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलाविली असून त्यात परीक्षेच्या वेळापत्रकाचा आढावा घेतला जाईल.
बारावीच्या विज्ञान आणि गणित विषयाचा अभ्यासक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) धर्तीवर बदलण्यात आला आहे. बारावीच्या नव्या अभ्यासक्रमाचे विस्तृत स्वरूप पाहता गणित आणि विज्ञान या मुख्य विषयांच्या परीक्षांमध्ये असलेले एका दिवसाचे अंतर चार ते पाच दिवस करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने विद्यार्थी-पालकांकडून होत आहे. या पाश्र्वभूमीवर दर्डा यांनी वेळापत्रकाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रश्नावर पालक आणि राज्य शिक्षण मंडळ यांच्या परस्परविरोधी दोन बाजू असून त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे दर्डा यांनी सांगितले. आमदार बाळा नांदगावकर यांनीही मुख्यमंत्री आणि दर्डा यांना पत्र लिहून बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी केली होती. त्यावर पुढील २४ तासांत निर्णय घेण्याचे आश्वासन दर्डा यांनी दिल्याचे नांदगावकर यांनी सांगितले. वेळापत्रकात बदल करण्याची मागणी होत असली तरी बारावीच्या परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाल्याने या टप्प्यावर वेळापत्रकात बदल करता येणार नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले.