सर्व रेल्वे स्थानकांवर बंदोबस्तात वाढ
रेल्वे लोकल गाडय़ांमध्ये घातपात घडविण्याचा आयसिसच्या दहशतवाद्यांचा डाव होता, असा संशय व्यक्त केला जात आहे. या वृत्तास राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाकडून दुजोरा मिळालेला नाही. मात्र मुंबईसह राज्यातून तीन दहशतवादी पकडले गेल्यानंतर रेल्वेवरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पाश्र्वभूमीवर पहिल्यांदाच महत्त्वाच्या सर्व रेल्वे स्थानकांमध्ये बंदुकधारी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
देशभरात अटक करण्यात आलेल्या आयसिसच्या दहशतवाद्यावर घातपाताची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु त्याबाबत निश्चित माहिती मिळालेली नाही. राज्यातून ताब्यात घेण्यात आलेल्या तिन्हीही दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरू आहे. उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतलेला रिझवान हा राज्य दहशतवादविरोधी विभागाच्या कोठडीत आहे.