‘अल्ट्रासॉनिक’ पद्धतीचा वापर

गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवर रूळाला तडे जाण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळेस प्रामुख्याने हे होत असल्याने लोकल सेवा ठप्प होऊन प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेच वारंवार घडणाऱ्या या प्रकारांना व त्यावर तोडगा म्हणून मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील रुळांची तपासणी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी अल्ट्रासॉनिक पद्धतीचा वापर केला जाणार आहे.

गुरुवार- शुक्रवार आणि सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री या अल्ट्रासॉनिक पध्दतीद्वारे ही तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत रूळांमध्ये बिघाड असल्यास तो तात्काळ निदर्शनास येणार आहे. तसेच त्याचवेळी रूळाची दुरुस्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. याबाबत अधिक माहिती देताना ट्रान्स हार्बर मार्गावर गुरुवार-शुक्रवारच्या मध्यरात्री नेरूळ ते ठाणे दरम्यान ही तपासणी करण्यात येणार असल्याचेही मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या तपासणीकरीता विशेष लोकल चालविण्यात येणार असून मध्यरात्री २.१५ वाजता ही लोकल ठाणेकरता रवाना करण्यात येईल. ही लोकल २.४५ वाजता ठाणे स्थानकात दाखल होईल. त्यानंतर मध्यरात्री २.५५ वाजता ही लोकल ठाण्याहून नेरूळच्या दिशेने रवाना होईल व ३.२५ वाजता नेरूळ स्थानकात दाखल होईल.

तर हार्बर मार्गावर देखील वाशी-वडाळा-पनवेल दरम्यान रूळांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवार आणि मंगळवारच्या मध्यरात्री १ वाजता विशेष लोकल वाशी स्थानकातून वडाळासाठी रवाना करण्यात येईल. ती १.३० वाजता वडाळा स्थानकात दाखल होईल. ही लोकल मध्यरात्री १.४० वाजता वडाळाहून पनवेलसाठी रवाना होईल. त्यानंतर मध्यरात्री २.५० वाजता ही लोकल वाशीकरिता रवाना होईल. या काळात रेल्वे रूळ न ओलांडण्याचे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.