‘आता हे अती झाले. हा दामिनीचा मृत्यू नसून आपल्या देशातील माणुसकीचा मृत्यू आहे. सरकारने खडबडून जागे व्हायला हवे आणि या निर्घृण कृत्याबद्दल दोषींना कठोर शिक्षा द्यायला हवी, अशा शब्दांत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी  दिल्लीतील बलात्काराला बळी पडलेल्या तरुणीबद्दल संताप व्यक्त केला आहे.  तसेच‘अमानत’ म्हणा किंवा ‘दामिनी’ नाव काहीही असले तरी, आता ते फक्त नाव राहिले आहे. या तरुणीचा शरीराने मृत्यू झाला असला, तरी तिचा आत्मा कायम आपल्या हृदयाला हात घालत राहणार आहे, असे मत बिग बी अमिताभ बच्चनने व्यक्त केले.
शाहरूख खान म्हणतो, आम्ही तुला वाचवू शकलो नाही परंतु, तुझा  आवाज बुलंद होता. तू शूर आहेस. मी पुरुष आहे, याचे मला दु:ख होतेय. तुझ्या न्यायासाठी मी लढेन असे तुला वचन देतो, असेही त्याने ट्विट केले आहे.
दिग्दर्शक शेखर कपूर म्हणाले की, तिचे सर्वात मोठे दु:ख असेल की कदाचित आपण सगळे जण जे घडले ते पार विसरून जाऊ. पण आपण हे सर्व विसरलेला नाही, ही सर्वात चांगली बाब आहे.
महिलांनो, तुमच्या गप्प बसण्याने तुमचे संरक्षण होणार नाही, तुमच्या मनातले बोला, जे घडते ते सांगा किंवा कायमचे शांत व्हा, अशा शब्दांत महेश भटने घटनेबद्दल राग व्यक्त केला. अनुराग कश्यप म्हणतो, मला लाज वाटतेय.. आणि दु:खसुद्धा होतेय आणि संतापसुद्धा येतोय. अनुपम खेर म्हणतो, हा माणुसकीचा आणि माणसाच्या सन्मानाचा मृत्यू आहे. मेट्रो रेल्वे आणि इंडिया गेट किंवा भारत बंद करण्याची ही वेळ नाही. क्षमा मागण्याची वेळ आहे, असेही त्याने ट्विट केले. अभिनेता बोमन इराणी म्हणाला की, ती क्रांतीची सैनिक आहे. तिला आपण विसरलो, तर ते शरमेचे ठरेल.
मृत्यूशी अथक झुंज देणाऱ्या तुझ्यासारख्या शूर मुलीला सलाम. तुझ्या मृत्यूबद्दल आम्हाला लाज वाटते, असे करण जोहरने ट्विट केले आहे. मधुर भांडारकर म्हणतो, ‘दामिनी, आपल्या लोकशाहीचा आजचा काळा दिवस आहे. आता जो उद्रेक होतो आह़े  तसाच लढा पुढेही देण्याची प्रतिज्ञा आपण करायला हवी. ‘क्रांतीची सुरुवात करण्यासाठी एका निरपराध व्यक्तीचा बळी द्यावाच लागतो का? मला आशा आहे तिचे बलिदान व्यर्थ जाणार नाही’, असे ट्विट अजय देवगणने केले आहे.