सव्वा लाखाहून अधिक तरुणांना प्रशिक्षण

कोकण रेल्वे, भारत इलेक्ट्रॉनिक्स, तळोजा, पुणे, भारत फोर्ज, मारुती सुझुकी, फोक्स व्ॉगन, टाटा ट्रस्ट यांसह सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांतील कंपन्यांशी ३३ सामंजस्य करार कौशल्यविकास विभागाने गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये केले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या राज्यातील आयटीआयसाठी प्रथमच ‘सीएसआर’च्या माध्यमातून अर्थसाहाय्य देत असून त्यातून शेकडो संस्थांचा कायापालट होणार आहे. राज्यात आतापर्यंत दोन हजाराहून अधिक संस्थांमध्ये कौशल्यविकास अभ्यासक्रम प्रशिक्षणास सुरुवात झाली असून त्याचा लाभ सव्वा लाख तरुणांना होत आहे.

कौशल्यविकास विभागाकडून अनेक सार्वजनिक व खासगी क्षेत्रांतील कंपन्यांच्या सहकार्याने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)चा कायापालट करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. कोकण रेल्वेसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांकडून व कंपन्यांकडून सीएसआरच्या माध्यमातून राज्यात मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतेच याबाबत सामंजस्य करार करण्यात आले. या कंपन्यांनी आपल्या विभागातील शासकीय आयटीआयमधील प्रयोगशाळा, कार्यशाळांचे आधुनिकीकरण व अन्य सुविधा पुरविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बॉस्को इंडिया, सिमेन्स, सिस्को, टाटा मोटर्स आदींकडून अनेक संस्थांमध्ये वेगवेगळ्या सुविधा व यंत्रसामग्री पुरविली जाईल. टाटा ट्रस्टकडून १०० शासकीय संस्थांमध्ये व्हच्र्युअल क्लासरूम तयार करण्यात येत आहेत, अशी माहिती कौशल्यविकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी दिली. ‘स्किल सखी’चा प्रयोगही यशस्वी झाला असून ‘ओव्हरसीज एम्प्लॉयमेंट अ‍ॅण्ड प्लेसमेंट सेंटर’ या संकल्पनेवरही विभागाचे काम सुरू आहे.