हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक कुंदन शहा यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. शहा यांच्या मुलीने त्यांच्या निधनाची माहिती दिली.

‘जाने भी दो यारो’ (१९८३), ‘कभी हाँ कभी ना’ (१९९३) या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. तर टेलिव्हिजनवरील ‘नुक्कड’ (१९८६) आणि ‘वागले की दुनिया’ (१९८८) या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या मालिकाही प्रचंड लोकप्रिय ठरल्या. ‘पी से पीएम तक’ हा २०१४ साली आलेला चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट ठरला.

पुण्यातील ‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्सिट्यूट ऑफ इंडिया’ (FTII) मध्ये त्यांनी शिक्षण घेतले होते. ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाने त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. आजही या चित्रपटाची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील क्लासिक कलाकृतींमध्ये केली जाते. त्यांना या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर शहा यांनी ‘क्या कहना’ (२०००), ‘दिल है तुम्हारा’ (२००२) या चित्रपटांचेही दिग्दर्शन केले.

बॉलिवूड दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ट्विटरद्वारे शहा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.