सध्या सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी नोट बंदीमुळे चच्रेत आहेत, तर अनेकजण मोदींचे चाहते बनले आहेत. सोमवारी चक्क पश्चिम रेल्वेच्या भाईंदरहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये ‘जय हिंद, जय मोदी’ अशी उद्घोषणा करण्यात आली. ‘जय मोदी, जय हिंद’ची घोषणा होताच लोकलमधील अनेक प्रवाशांनी आधी कान टवकारले. पण, आपण जे ऐकले तेच सहप्रवाशाने ऐकल्याचे समजताच हास्याचा एकच कल्लोळ झाला. तर काही प्रवाशांनी या बाबत नाराजी व्यक्त करत रेल्वेकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

भाईंदर येथून चच्रेगटच्या दिशेला जाणारी अप मार्गावरील ९.५३ची लोकल अंधेरी स्थानकात येताच, ही ‘लोकल जलद लोकल असून अंधेरी ते वांद्रे, वांद्रे ते दादर, दादर ते मुंबई सेंट्रल या मार्गावर थांबणार नाही,’ अशी घोषणा झाली. ही घोषणा संपताच उद्घोषकाने ‘जय हिंद, जय मोदी’चा नारा दिला. यावेळी या लोकलमधील काही प्रवाशांनी हास्याचा एकच कल्लोळ केला, तर काही प्रवाशांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली.

याच लोकलमधून प्रवास करणारे उच्च न्यायालयातील वकील एस.एस. सय्यद यांनी याबाबत आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी सदर उद्घोषकाने केलेल्या घोषणेमुळे माझ्या भावना दुखावल्या आहेत. त्या उदघोषकाविरोधात त्वरीत कारवाई करावी अशी नोटीस पश्चिम रेल्वेचे चर्चगेट येथील विभागीय अधिकारी यांना बजावली आहे. सदर व्यक्तिविरोधात मोटरमन कायद्यानुसार त्वरीत कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सय्यद यांनी केली आहे.

‘पडताळणी करू’

जर एखाद्या व्यक्तीने तक्रार केली असेल तर त्याची दखल घेत सदर प्रकाराची पडताळणी केली जाईल आणि लेखी स्वरूपात खुलासा केली जाईल असे पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डेव्हिड यांनी सांगितले.