पुढील गाडय़ांच्या आरक्षणांमुळे अडचणीत वाढ

मुंबईच्या भयंकर उकाडय़ापासून सुटका करून भारताच्या नंदनवनात म्हणजेच काश्मीरला फिरायला गेलेल्या १५० मुंबईकरांसमोर मोठी समस्या उभी ठाकली आहे. परतीच्या प्रवासासाठी जम्मू-मुंबई गाडीचे आरक्षण केलेल्या या प्रवाशांची गाडी आयत्या वेळी रद्द करण्यात आली. या प्रवाशांना त्याबाबत काहीच आगाऊ सूचना न दिल्याने आता हे प्रवासी अडकून पडले आहेत. त्यातच पुढील काही दिवस गाडय़ांची आरक्षणे फुल्ल असल्याने या प्रवाशांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

रेल्वेच्या जालंधर स्थानकाजवळ रेल्वेची महत्त्वाची कामे सुरू आहेत. त्यामुळे तेथे काही दिवसांपासून ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे ३१ मे रोजीची जम्मू-मुंबई एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. याबाबतची माहिती स्थानिक वृत्तपत्रांमध्येही छापून आली होती. तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरही ही माहिती देण्यात आली आहे. मात्र इतर वेळी छोटय़ा छोटय़ा गोष्टीही प्रवाशांना मोबाइलवर एसएमएसद्वारे कळवणाऱ्या रेल्वेने ही गाडी रद्द झाल्याची माहिती प्रवाश्यांना दिली नाही.

आपली सहल संपवून मंगळवारच्या गाडीने मुंबईकडे येण्यासाठी सज्ज झालेल्या प्रवाशांना जम्मूला प्लॅटफॉर्मवर पोहोचल्यावर याबाबत माहिती मिळाली. त्यांनी हताशपणे पुढील तारखांची तिकिटे काढण्याचा प्रयत्न केला असता पुढील अनेक दिवसांची आरक्षणे आधीच फुल्ल झाली असल्याचे त्यांना आढळले. सहलीला आल्यानंतर वृत्तपत्रे कोण वाचतात, गाडी रद्द झाली असेल, तर प्रवाशांना कळवणे ही रेल्वेची जबाबदारी आहे, असे मत तेथे अडकलेल्या १५० प्रवाशांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.