झोकून देऊन काम करणारे शिक्षक व सेवेचे मोल जाणणारी संस्था यांच्या अनोख्या ऐक्यातून आत्मविश्वासपूर्ण आयुष्य घडविण्याचे काम दादरमधील एका शाळेत गेली पन्नास वर्षे अविरतपणे सुरू आहे. रोहिणीताई लिमये यांनी पन्नास वर्षांपूर्वी कर्णबधिर मुलांच्या शिक्षणासाठी स्वत:च्या घरात सुरुवातीला ही शाळा सुरू केली. जानकीबाई शिक्षण संस्थेच्या या शाळेला २६ जानेवारी १९६६ रोजी शासनाची मान्यता मिळाली. जागा व पैसा यांचे पाठबळ नसतानाही रोहिणीताईंनी सुरू केलेली शाळा आज दादरच्या पोर्तुगीज चर्च येथे शेकडो कर्णबधिर मुले व त्यांच्या पालकांचे आशास्थान बनले आहे.
बहिरेपणामुळे सर्वसामान्य मुलांपासून वेगळे पडलेल्या या मुलांच्या अंगी असलेले कलाकौशल्य जोपासण्याचे कामही संस्था करत असून यासाठी चित्रकला, हस्तकला, रांगोळी, सौंदर्यशास्त्र आदी विषय शिकविण्याची व्यवस्थाही शाळेने केली आहे. एमएससीआयटीपासून अनेक छोटे संगणकीय उपक्रम शिकवून स्वत:च्या पायावर या मुलांनी खंबीरपणे उभे राहावे यासाठी विशेष लक्षही दिले जाते. मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन करण्याबरोबरच शाळेतील एका निवृत्त शिक्षिकेने आपल्या घरी या कर्णबधिर मुलांच्या पालकांसाठी उद्योग केंद्र सुरू केले आहे. खास मराठी पदार्थ तयार करून त्याच्या विक्रीतून मिळालेले उत्पन्नही या पालकांना दिले जाते.
गेली ३४ वर्षे त्या या शाळेत मुख्याध्यापिका असून त्यांच्यापूर्वी श्रीमती लिमये तसेच डॉ. आशा थत्ते यांनीही मुख्याध्यापिका म्हणून दहा वर्षे काम पाहिले. संस्थेच्या अध्यक्षा प्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड यांचे मायेचे छत्र आणि संस्थेच्या सर्वागीण विकासात साऱ्याच विश्वस्तांचा मोलाचा वाटा असल्याचे मुख्याध्यापिका श्रीमती वाघमारे यांनी सांगितले. येत्या २६ जानेवारी रोजी संस्था सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करणार आहे. मुलांना ऐकू यावे यासाठी कानाचे मशीन तसेच शिक्षणासाठी आवश्यक अत्याधुनिक उपकरणेही संस्थेकडून देण्यात येतात. याकामी लायन्स क्लब, रोटरी क्लब तसेच स्टेट बँकेसह अनेक संस्था व दानशूर लोकांकडून मदत मिळते. तसेच शासनाकडूनही अनुदान मिळत असले तरी मुलांमागे मिळणाऱ्या अनुदानातून ‘खडूही’ घेणे जिकिरीचे ठरेल, असे येथील शिक्षकांचे म्हणणे आहे. समाजातील दानशूर लोकांनी तसेच सरकारने सढळ हस्ते मदत केल्यास हजारो कर्णबधिर मुलांचे आयुष्य चांगले घडण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही हे शिक्षक व्यक्त करतात.

कल्याण-डोंबिवली ते वसई-विरारपासून येथे कर्णबधिर मुले शिकण्यासाठी येतात. नर्सरी ते दहावीपर्यंतचे शिक्षण देताना मुलांमधील आत्मविश्वास वाढविण्याला प्राधान्य दिले जाते.
    – यशोधरा वाघमारे, मुख्याध्यापिका