प्रदर्शनांऐवजी हिटलर, कृष्णवर्णीयांबाबत विद्वेष पसरवणारी माहिती प्रसिद्ध

प्रसिद्ध जहांगीर कलादालनाचे अधिकृत संकेतस्थळ हॅक झाल्याची बाब समोर आली आहे. शनिवारी या संकेतस्थळावर कला प्रदर्शनांच्या माहितीऐवजी हिटलर आणि कृष्णवर्णीयांबाबत आक्षेपार्ह मजकूर व संबंधित छायाचित्रे पाहायला मिळाली. संकेतस्थळ हॅक झाल्याच्या वृत्ताला कलादालनातील एका अधिकाऱ्याने दुजोरा दिला. तसेच संकेतस्थळ हाताळणाऱ्या कंपनीला त्याबाबतची माहिती दिल्याचेही या अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.

दरम्यान, याबाबत कलादालनाकडून कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झालेली नाही, अशी माहिती परिमंडळ एकचे उपायुक्त मनोजकुमार शर्मा व कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय धोपावकर यांनी दिली.

या संकेतस्थळावर एरवी मुंबईतील पाच कला प्रदर्शनांची माहिती एकाच वेळी कळते. तेथे शनिवारी भलतेच संदेश, मजकूर, छायाचित्रे दिसू लागल्याने रसिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. हिटलर आधुनिक काळातील प्रेषित असून येशूप्रमाणेच त्यालाही मारण्यात आले, असा संदेश कलादालनाच्या संकेतस्थळावर अग्रभागी होता. त्या खालोखाल कृष्णवर्णीयांबद्दल विद्वेष पसरवणारे संदेशही होते. या संदेशांशी मिळतीजुळती छायाचित्रेही प्रसिद्ध करण्यात आली होती.

कलादालनाच्या एका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहाच्या सुमारास कलादालन बंद झाल्यानंतर संकेतस्थळावर हल्ला घडल्याची माहिती मला मिळाली. मी घरी निघालो होतो. जी कंपनी संकेतस्थळ हाताळते तेथे संपर्क साधून या माहितीची खातरजमा केली. या कंपनीला आक्षेपार्ह मजकूर संकेतस्थळावरून काढून टाकण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच याबाबत लवकरच पोलीस तक्रार करण्यात येणार आहे.