विमान प्रवासादरम्यान बाळाचा जन्म झाल्याने जेट एअरवेजचे विमान मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले. सौदी अरेबियातल्या दमाममधून जेट एअरवेजचे बोईंग ७३७ हे विमान १६२ प्रवाशांना घेऊन कोचीला निघाले. या विमानाने उड्डाण केले, ते कोचीच्या दिशेने निघाले. मात्र एका महिलेला मुदपूर्व प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यानंतर लगेचच वैमानिकांनी हे विमान मुंबईला वळवण्याचा निर्णय घेतला. यानंतर विमानतल्या प्रशिक्षित मेडिकल स्टाफने ३५ हजार फूट उंचीवर असताना या महिलेची यशस्वी प्रसुती केली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, या महिलेने गुटगुटीत बाळाला जन्म दिला.

मुंबईत विमान आल्यावर या महिलेला आणि तिच्या बाळाला होली स्पिरीट रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळ आणि त्याची आई दोघांची प्रकृती चांगली आहे अशी माहिती समोर येते आहे. या बाळाला जेट एअरवेजने आयुष्यभराचा मोफत केला असून तसा पासही भेट दिला आहे. त्यामुळे आता या बाळाला जेट एअरवेजने प्रवास आयुष्यभरासाठी मोफत आहे. महिलेला विमानात बाळ झाल्याचा आणि ते सुखरूप जन्माला आल्याचा आनंद झाला आहेच. अशात जेट एअरवेजने दिलेल्या या गिफ्टमुळे हा आनंद द्विगुणित झाला आहे.  या महिलेचे नाव काय हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या महिलेला आपला हा विमान प्रवास आणि आपल्या बाळाचा जन्म कायम लक्षात राहणार आहे हे निश्चित!