घरच्यांच्या दबावामुळे प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिला म्हणून अल्पवयीन प्रेयसीला बळजबरीने अ‍ॅसिड पाजणाऱ्या माथेफिरू प्रेमवीराला सत्र न्यायालयाने दोषी ठरवीत १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच ६५ हजारांचा दंडही न्यायालयाने सुनावला आहे.
हितेंद्र सकपाळ (२१) असे या माथेफिरू तरुणाचे नाव असून तो हॉटेल व्यवस्थापनाचा विद्यार्थी आहे. १७ वर्षांची ही महाविद्यालयीन कांदिवली येथील काजूपाडा परिसरात राहायला आहे. हितेंद्र आणि या तिचे प्रेमसंबंध होते, परंतु तिच्या कुटुंबीयांना त्यांचे हे संबंध मान्य नव्हते. त्यामुळे तिने हितेंद्रशी संबंध तोडण्याचा निर्णय घेऊन त्याला टाळण्यास सुरुवात केली. मात्र त्यानंतरही घटनेच्या दिवशी म्हणजेच १९ ऑक्टोबर २०१३ रोजी हितेंद्रने तिला तिच्या महाविद्यालयात गाठून गोराई येथे घेऊन गेला. तेथे हितेंद्रने तिला बळजबरीने अ‍ॅसिड पाजण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला प्रतिकार केला आणि त्या प्रयत्नात तिच्या चेहऱ्यावर आणि ओठांवर अ‍ॅसिड पडले. त्याच वेळेच तेथून जाणाऱ्या एका रिक्षाचालकाने तरुणीला अन्य रिक्षाचालकांच्या मदतीने शताब्दी रुग्णालयात नेले. त्याच दिवशी हितेंद्रला पोलिसांनी अटक केली.
या प्रकरणी पोलिसांतर्फे रिक्षावाला आणि ज्याच्याकडून हितेंद्रने अ‍ॅसिड विकत घेतले अशा दोघांना त्याच्याविरोधात न्यायालयात साक्षीदार म्हणून उभे केले. पोलिसांनी हितेंद्रविरोधात सादर केलेले सगळे साक्षीपुरावे न्यायालयाने ग्राहय़ मानले.