जे. जे. उड्डाणपुलाच्या कडेला ध्वनिरोधक भिंती उभारण्याची मागणी

दक्षिण मुंबईमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते भायखळ्यादरम्यान जे. जे. मार्गावर उभारण्यात आलेल्या कुतुब-ए-कोकण मकदुमअली माहिमी उड्डाणपुलामुळे आसपासच्या इमारतींमधील रहिवाशी हैराण झाले आहेत. घरापासून अवघ्या चार-पाच फुटांवर असलेल्या या पुलावरील वाहनांची सुसाट वर्दळ, त्यामुळे उडणारी धूळ आणि पुलावरून घरात डोकावणारे चेहरे यांमुळे या इमारतींमध्ये राहणारे रहिवासी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे आता इतर पुलांप्रमाणे येथेही बॅरिकेड उभारून या समस्यांपासून सुटका करण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून भायखळ्याच्या दिशेला जाणारा मोहम्मद अली रोड, जे. जे. मार्गावर पूर्वी कायम होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक, पादचारी आणि या परिसरातील रहिवासी हैराण झाले होते. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी जे. जे. मार्गावर कुतुब-ए-कोकण मकदुमअली माहिमी उड्डाणपूल बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून लालबागच्या दिशेने पुढे जाणाऱ्या वाहनांसाठी हा पूल वरदान ठरला. त्याचबरोबर मोहम्मद अली रोड, जे. जे. मार्गावरील वाहतुकीवरील ताणही हलका झाला. परंतु जे. जे. मार्गावरील काही इमारतींपासून अवघ्या चार-पाच फूट दूर हा पूल आहे. या पुलावरून जाणाऱ्या वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली असून त्याबाबतची माहिती देणारे फलकही पुलावर बसविण्यात आले आहेत. परंतु या नियमांचे पालन बहुतांश वाहनचालक करत नाहीत.

सुसाट धावणारी वाहने, गरज नसताना वाहनांचे भोंगे वाजवणे यामुळे पुलालगतच्या इमारतींमधील रहिवाशांना ध्वनिप्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.

दिवसाच नव्हे तर रात्री-अपरात्रीही या पुलावरून भरधाव वेगात जाणारी वाहने आणि वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजाने रहिवाशांची झोपमोड होते. तसेच वाहनांबरोबर मोठय़ा प्रमाणावर धूळ उडत असून ती घरामध्ये पसरते. वारंवार स्वच्छता केली तरी धूळ कमी होत नाही. त्यामुळे रहिवासी हैराण झाले आहेत. मुंबईमधील जागांचे दर प्रचंड वाढले असून ते आवाक्याबाहेर गेले आहेत. इथले घर विकून दुसरीकडे राहावयास जायचे म्हटले तरी नव्या जागेचे दर परवडणारे नाहीत, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

जे. जे. मार्गावरील इमारतींतील रहिवाशांची या समस्येतून सुटका करण्यासाठी पालिकेच्या ‘बी’ विभाग कार्यालयाने प्रशासनाला एक प्रस्ताव पाठविला आहे. या पुलावर साधारण सात-आठ फूट उंचीचे बॅरिकेड बसविल्यास रहिवाशांची आवाज आणि धुळीच्या त्रासातून सुटका होऊ शकेल. दादर आणि माटुंगा येथील उड्डाणपुलावर अशा प्रकारचे बॅरिकेड बसविण्यात आले असून त्यामुळे आसपासच्या रहिवाशांना होणारा त्रास कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांची त्रासातून मुक्तता करण्यासाठी पुलावर बॅरिकेड बसवावेत, असे या प्रस्तावात म्हटले आहे. ‘बी’ विभाग कार्यालयाने याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाला सादर केला आहे. परंतु अद्याप या प्रस्तावावर कोणताच निर्णय झालेला नाही.