तब्बल ५९ टक्के पदे रिक्त

मुलांच्या भविष्यासाठी इंग्रजी माध्यमांकडे जाणाऱ्या पालकांना उत्तम शाळांचा पर्याय देण्यासाठी आणल्या गेलेल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकांची तब्बल ५९ टक्के पदे रिक्त आहेत. पटावर असलेले शिक्षकही मराठी व गुजराती शाळांमधून आयात करण्यात आले असून या शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाबाबतच शंका उपस्थित होत आहे. मुंबई पब्लिक स्कूलसोबतच पालिकेकडून चालवल्या जाणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांच्याही तब्बल ३५ टक्के जागा रिक्त आहेत.

महानगरपालिकेकडून आठ भाषांमधून शाळा चालवल्या जातात. गेल्या पंधरा वर्षांत हिंदूी व उर्दू भाषा वगळता इतर माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गळती लागलेली आहे. महापालिका शाळेतील शिक्षणाचा दर्जा तसेच इंग्रजी भाषेकडील ओढा यामुळे गरीब वस्त्यांमधील पालकही मुलांना खासगी शाळेकडे पाठवतात. यावर उपाय म्हणून दहा वर्षांपुर्वी महानगरपालिकेने मुंबई पब्लिक स्कूल या संकल्पनेमार्फत खासगी शाळांना पालिकेच्या इमारतींमध्ये शाळा चालवण्यास परवानगी दिली. त्याचप्रमाणे काही शाळा महानगरपालिकेकडून चालवल्या जातात.

मुंबई पब्लिक स्कूलमध्ये इंग्रजी भाषेतून शिकवण्यासाठी शिक्षकच नाहीत. काही ठिकाणी सीए, बीकॉम, बीए असलेली मुले शिक्षकाचे काम करतात. त्यांनी अधिकृत पदवी मिळवलेली नाही. त्याचप्रमाणे मराठी, गुजराती माध्यमातील अतिरिक्त शिक्षकांना या शाळांमध्ये वळवण्यात आले आहे. या शिक्षकांना इंग्रजीतून शिकवण्याचा अनुभव नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, अशी माहिती महापालिकेच्या शिक्षण समितीचे माजी सदस्य शिवनाथ दराडे यांनी दिली. त्यामुळे शाळांचे वर्ग अनेकदा रिकामे असतात व विद्यार्थ्यांची संख्या केवळ पटावरच मोठी भासते, असेही ते म्हणाले. मराठी माध्यमातील शाळांमध्ये १३ टक्के म्हणजे २५२ शिक्षक अजूनही अतिरिक्त असून गुजराती शाळांमधील ४४ शिक्षक अतिरिक्त आहेत.

९२३ शिक्षक आवश्यक

या शाळांची एकूण संख्या ६० असून पटावर तब्बल २६ हजारांहून अधिक विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांसाठी किमान ९२३ शिक्षक आवश्यक आहेत. मात्र प्रत्यक्षात या शाळांमध्ये केवळ ३७७ शिक्षक आहेत. तब्बल ५९ टक्के म्हणजे अध्र्याहून अधिक शिक्षकांच्या जागा भरलेल्या नाहीत. महापालिकेच्या इंग्रजी माध्यमांची स्थितीही चांगली नाही. पालिकेकडून इंग्रजी माध्यमाच्या ५४ शाळा चालवल्या जातात. या शाळांमधील पटावर असलेल्या ३५ हजार विद्यार्थ्यांसाठी १२७१ शिक्षक आवश्यक असून त्यातील ४४३ पदे रिक्त आहेत. मातृभाषेला पर्याय म्हणून महानगरपालिकेने इंग्रजी माध्यमांची कास धरलेली असली तरी पुरेसे आणि पात्रता नसलेले शिक्षकच पालिकेला पुरवता आले नसल्याचे स्पष्ट होत आहे.