एकीकडे शहरातील उंच इमारती अग्निसुरक्षा नियमांचे पालन करण्याची टाळाटाळ करत असतानाच नागरी सेवा पुरवण्यासाठी अग्निशमन दल मात्र २० कोटी रुपये खर्चून ९० मीटर उंचीची शिडी फिनलंडहून मागवत आहे. शहरातील उंच इमारतींची वाढती संख्या आणि लोटस बिझनेस पार्क येथील आगीची नुकतीच घडलेली दुर्घटना या पाश्र्वभूमीवर ही शिडी आणण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने मांडला आहे.
अग्निशमन दलाकडे सध्या ७० मीटर उंचीची शिडी आहे. मात्र ७० मीटरपेक्षा उंच असलेल्या इमारतींसाठी त्यापेक्षा अधिक उंचीची शिडी आवश्यक असल्याचे अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यानुसार गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पालिकेने काढलेल्या निविदेला फिनलंडमधील एका कंपनीचा प्रस्ताव आला. त्यानंतर संबंधित कंपनीकडून शिडी घेण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. जानेवारीमध्ये या शिडीची किंमत १७ लाख ३५ हजार युरो ठरली. फेब्रुवारीतील युरोची ८६.१६ रुपये किंमत लक्षात घेता सेवा शुल्क तसेच इतर किरकोळ खर्च धरून शिडीची किंमत १९ कोटी १९ लाख रुपये झाली. मात्र आता युरोचा दर वाढला असल्याने शिडीची किंमतही वाढणार आहे. हा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीत मंजूर झाल्यास फिनलंडहून वर्षभरात शिडी येऊ शकेल.
जगात ९० मीटर उंचीपेक्षा अधिक उंचीची शिडी तयार करण्यात आलेली नाही. मात्र टॉवरची उंची त्यापेक्षाही अधिक असल्याने या टॉवरनी स्वत:साठी अग्निशमन व्यवस्था असणे आवश्यक ठरते. शहरातील टॉवरनी स्वतची अग्निशमन यंत्रणा उभारावी, ही यंत्रणा उभारल्यावर अग्निशमन दलाकडून मान्यता घ्यावी, यंत्रणेची दर सहा महिन्यांनी तपासणी करावी व त्याबाबतचा अहवाल अग्निशमन दलाकडे दाखल करावा, असे नियम आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि त्याबद्दल इमारतींवर कारवाईही केली जात नाही.

१२० मीटरची शिडी अव्यवहार्य
९० मीटर उंचीची शिडी आणण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मांडला जात असतानाच आता लोकप्रतिनिधींना १२० मीटर उंचीच्या शिडीची स्वप्ने पडली आहेत. फिनलंडमध्ये आता १२० मीटर उंचीच्या शिडी तयार केल्या जात असून मुंबईतील टॉवरची वाढती संख्या लक्षात घेता अग्निशमन दलाकडे ही शिडी येणे गरजेचे आहे, असे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे म्हणाले. मात्र फिनलंडमध्येही ११० मीटर उंचीची शिडीही अजून प्रयोगावस्थेत असून ती बाजारपेठेत येण्यासाठी आणखी दीड वर्ष लागेल. या शिडीसंबंधीही फिनलंडमधील कंपनीशी चर्चा झाली मात्र शहरातील जमिनीचा भुसभुशीतपणा पाहता या शिडीचे वजन पेलवणार नसल्याचे स्पष्ट झाले, असे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख म्हणाले.