बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणाचा निकाल देणारे न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यंची बदली करण्यात आली आहे. नियोजित बदल्यांच्या नियमानुसार मुंबई उच्च न्यायालयाने एकूण ८८ न्यायाधीशांच्या बदल्यांचा आदेश काढला असून त्यात अभिनेता सलमान खानविरोधातील ‘हिट अँ रन’ खटल्याचे न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांचाही समावेश आहे. देशपांडे यांची बदली सातारा न्यायालयात करण्यात आली आहे. मात्र, येत्या ६ मे रोजी सलमान खटल्याचा निकाल दिल्यानंतरच त्यांना बदलीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. बदल्यांच्या नियमावलीनुसार न्यायाधीशांनी त्यांचे निकालाचे काम पूर्ण करुनच नव्या जागी रुजू व्हावे, असे अपेक्षित असल्याने न्या. देशपांडे यांना सलमानचा खटला व अन्य निकालपत्रे दिल्यानंतरच बदलीच्या ठिकाणी जावे लागेल.
दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून एकाच्या मृत्यूस व चौघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाप्रकरणी अभिनेता सलमान खानवर चालविण्यात येणाऱ्या खटल्याचा निकाल बुधवारी ६ मे रोजी सकाळी ठीक ११ वाजून १५ मिनिटांनी सत्र न्यायालय देणार आहे. त्यामुळे १३ वर्षांपूर्वीच्या या खटल्यात न्यायालय सलमानला दोषी ठरवून शिक्षा सुनावणार की त्याची निर्दोष मुक्तता करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.