अवघ्या २०व्या वर्षी स्वत:चा जीव धोक्यात घालून वडिलांना यकृत दान करून त्यांना पुनर्जन्म देणारी जळगावची जुही पवार आता राज्याच्या आरोग्य विभागाची सदिच्छा दूत झाली आहे. मिस इंडिया होण्याची स्वप्ने उराशी बाळगणारी जुही आता अवयवदानाबाबत जनजागृती करणार आहे.
जुही सध्या मुंबईच्या के. जे. सोमय्या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत असून मिस इंडिया स्पर्धेचीही तयारी करीत आहे. दोन वर्षांपूर्वी तिचे वडील प्रा. रवींद्र  पवार यांचे यकृत ‘हेपिटायटीस सी’मुळे निकामी झाले. यकृती प्रत्यारोपण केल्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. यकृत प्रत्यारोपणासाठीच्या प्रतीक्षा यादीत त्यांचा क्रमांक ३५०वा होता. आई आणि मोठय़ा भावाचा रक्तगट वेगळा असल्याने त्यांचे यकृत प्रत्यारोपण करणे शक्य नव्हते आणि जवळचे नातेवाईकही यकृतदानासाठी पुढे यायला तयार नव्हते.
अशा वेळी कोणताही विचार न करता जुहीने यकृतदान करून वडिलांना पुनर्जन्म दिला. मात्र यकृत प्रत्यारोपणापूर्वी आपल्या मुलीचा जीव धोक्यात जाण्याच्या भीतीने तिचे आई-वडीलही चिंतेत होते. शिवाय यकृत प्रत्यारोपणामुळे जुहीच्या पोटावर उठणाऱ्या व्रणांमुळे तिचे मिस इंडियाचे स्वप्नही भंगणार होते.
मात्र, जुहीनेच आईला धीर दिला व आपला निर्णय पक्का असल्याचे सांगितले आणि यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यानंतर पवार या आजारातून बरे झाले आणि कॉलेजमध्ये रुजूही झाले. पण पुन्हा आजार बळावल्याने त्यांच्या किडनीची शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. तेव्हाही जुहीने किडनीदान करण्याची तयारी केली होती, मात्र शस्त्रक्रियेपूर्वीच वडिलांचे निधन झाले.
वडिलांच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून जुही आता अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या या कर्तृत्वाची दखल घेत राज्याच्या आरोग्य विभागाने तिची अवयवदान जनजागृती मोहिमेसाठी सदिच्छा दूत म्हणून तिची नियुक्ती केली आहे.