‘टीवायबीए’च्या पाचव्या सत्राच्या निकालातील घोळ; विद्यार्थी अडचणीत
चुकीचे ‘क्रेडिट’ दिले गेल्याने ‘तृतीय वर्ष कला शाखे’च्या (टीवायबीए) एप्रिल, २०१५मध्ये झालेल्या पाचव्या सत्राच्या परीक्षेचा निकाल रद्द करून तो नव्याने जाहीर करण्याची ऐतिहासिक नामुष्की मुंबई विद्यापीठावर ओढवली आहे. या सदोष मूल्यांकनाचा परिणाम टीवायबीए विद्यार्थ्यांच्या केवळ पाचव्या सत्राच्याच नव्हे, तर अंतिम निकालावरही होणार असल्याने त्यामुळे काहींचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेशही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पेपरफुटी, लांबणारे निकाल, त्यातले घोळ यामुळे विद्यापीठाचा परीक्षा विभाग कायमच चर्चेत असतो. पण या घोळाने या सर्वावर कडी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे तब्बल पाच महिन्यांनी हा घोळ विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून देईपर्यंत परीक्षा विभागाच्या लक्षातही आली नव्हता. ‘लोकसत्ता’ने ३० जानेवारीला या संबंधात ‘विद्यापीठाच्या निकालाचे ‘क्रेडिट’ पुन्हा चुकले’ या मथळ्याखाली वृत्त देईपर्यंत विद्यापीठातील वरिष्ठांनाही या घोळाची माहिती नव्हती. या वृत्तानंतर मात्र विद्यापीठाने तातडीने परीक्षा मंडळाची बैठक घेऊन या निकालात सुधारणा करून संपूर्ण निकालच नव्याने जाहीर करण्याचे ठरविले आहे. तसेच या घोळाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णयही घेतला आहे. या संदर्भात बुधवारी पुन्हा एकदा मंडळाची बैठक होणार असल्याचे विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी लीलाधर बनसोड यांनी सांगितले.ही परीक्षा ‘टीवायबीए’च्या पाचव्या सत्राच्या पुनर्परीक्षार्थीकरिता घेण्यात आली होती. त्याला तब्बल ४६०९ विद्यार्थी बसले होते. परंतु यापैकी ‘पेपर क्रमांक ६’ची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल बदलणार आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे.

घोळ नेमका काय?
‘श्रेणीआधारित मूल्यांकन पद्धती’नुसार संगणकावर मूल्यांकन करून निकाल तयार करताना चुकीचे ‘क्रेडिट’ दिले गेल्याने निकालातच घोळ झाला. यात पदवीच्या तीनही वर्षांतील सर्व पेपरमधील लेखी व अंतर्गत गुणांचा आढावा घेऊन निकाल तयार केला जातो. त्याला सीजीपीए म्हणतात. त्यासाठी ‘क्रेडिट’ला पेपरच्या ग्रेडशी म्हणजे श्रेणीशी गुणायचे. ग्रेड म्हणजे त्या विषयाच्या लेखी परीक्षेतील गुण. (उदाहरणार्थ, ६० ते ७५ दरम्यान गुण असतील तर ग्रेड झाली सहा) क्रेडिट आणि ग्रेडच्या गुणाकारातून विद्यार्थ्यांचा ‘ग्रेड पॉइंट’ बनतो. सर्व पेपरच्या ग्रेड पॉइंटची बेरीज करून त्याला सर्व पेपरच्या क्रेडिटच्या येणाऱ्या बेरजेने भागायचे आणि त्यानंतर येणारी संख्या म्हणजे एसजीपीए (सेमिस्टर ग्रेड पॉइंट अ‍ॅव्हरेज). अशी सहाही सत्रांची एसजीपीएची बेरीज करायची आणि येणाऱ्या संख्येला एकूण सत्रांनी (सहा किंवा आठ) भागायचे. त्यानंतर जी काही संख्या येईल त्याची सरासरी काढली की तो विद्यार्थ्यांचा सीजीपीए (अंतिम गुण) बनतो. या निकालात ‘पेपर क्रमांक ६’ करिता सरसकट सर्व विद्यार्थ्यांना एकच क्रेडिट दिले गेले.