कोकण रेल्वेचे दुपदरीकरण करावे, ही कोकणवासीयांची अनेक वर्षांची मागणी मध्य रेल्वेच्या हद्दीपुरती तरी आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पनवेल ते रोहा या मार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामासाठी मध्य रेल्वे येत्या मंगळवारी पेण ते जिते या दरम्यान दुपारी १.५० ते संध्याकाळी ५.५० या कालावधीत जंबोब्लॉक घेणार आहे. यामुळे मंगळवारी दिवा-रोहा ही पॅसेंजर आपटा स्थानकापर्यंतच जाईल तर इतर मेल-एक्स्प्रेस गाडय़ा दोन तास उशिराने धावतील.
पनवेल ते रोहादरम्यान दुपदरीकरणाचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे. या मार्गावरून अतिजलद गाडीही धावणार असल्याने हा रेल्वेमार्ग ताशी १६० ते २०० किलोमीटर वेगासाठीही योग्य असेल, याकडे लक्ष देण्यात येत आहे. या मार्गावर जिते-पेण (५०० मीटर), पेण-कासू (४५० मीटर) आणि कासू-नागोठणे (५०० मीटर) या टप्प्यांदरम्यान एकूण दीड किलोमीटर मार्ग वळणाचा आहे. येथे दुपदरीकरणासाठी सध्याची मार्गिका थोडी सरळ करावी लागणार आहे. त्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येईल. ही वळणदार मार्गिका दोन बाजूंनी कापून सरळ जोडली जाईल. वळणाची जागा मोकळी झाल्यावर ती जागा दुसरी मार्गिका टाकण्यासाठी उपलब्ध होणार आहे.
मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी दुपारी १.५० वाजल्यापासून हे काम सुरू होणार आहे. या कामादरम्यान कोकणात जाणारा हा मार्ग पूर्णपणे बंद राहील. मंगळवारी या वेळेत कमी गाडय़ा असल्याने मंगळवारची निवड करण्यात आली आहे. मात्र ब्लॉक काळात दिवा-रोहा ही सकाळी ९.१० ला दिव्याहून सुटणारी पॅसेंजर गाडी आपटा येथे रद्द केली जाईल. तर दुपारी ३.४० वाजता रोह्याहून सुटणारी रोहा-दिवा ही पॅसेंजर गाडी धावणार नाही. गाडय़ा एकामागोमाग एक खोळंबण्याची शक्यता असल्याने इतर मेल-एक्सप्रेस गाडय़ांची वाहतूक अर्धा ते दोन तास उशिराने होईल.