मध्य रेल्वेचे घाटकोपर आणि पश्चिम रेल्वेचे अंधेरी ही दोन्ही स्थानके एकमेकांना जोडणारी आणि पहिल्या दिवसापासूनच लाखो मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनलेली मेट्रो आता अधिक वेगवान होणार आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षांत मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मेट्रो वाहतुकीसाठी ताशी ५० किमीची वेगमर्यादा घालून दिली होती. आता ही वेगमर्यादा शिथिल करण्यासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त रविवारी विविध चाचण्या घेणार आहेत. त्यामुळे रविवारी मेट्रो मार्गावर तब्बल साडेसात तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येणार असून सकाळी साडेआठ ते दुपारी चार या वेळेत मेट्रो सेवा बंद राहील. या चाचणीदरम्यान मेट्रोची वेगमर्यादा ८० किमी प्रतितास एवढी करण्याबाबतचा निर्णय होईल. सध्या मेट्रोला ५० किमी प्रतितासाची वेगमर्यादा आहे. प्रत्यक्षात मात्र मेट्रो जास्तीत जास्त ३५ किमी वेगाने धावते. तरी भविष्यातील विचार करून मेट्रोची ५० किमीची वेगमर्यादा शिथिल करून ती ८० किमीवर नेणे आवश्यक आहे. त्यासाठी मेट्रोरेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांचे सुरक्षा प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. परिणामी रविवारी मेगाब्लॉकदरम्यान बक्षी ८० किमी वेगात मेट्रोचाचणी घेणार आहेत.

 

वेगमर्यादा आता ५० वरून ८० किमीवर

सकाळी ८.३० ते दुपारी ४.०० मेट्रो बंद

 

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक

मध्य रेल्वे : भायखळा-विद्याविहार या स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० दरम्यान.

परिणाम – ब्लॉकदरम्यान डाउन धीम्या मार्गावरील गाडय़ा भायखळा-विद्याविहार यांदरम्यान डाउन जलद मार्गावरून चालवल्या जातील. या गाडय़ा परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील. त्यानंतर या गाडय़ा पुन्हा डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.

हार्बर मार्ग : कुर्ला-वाशी या स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० दरम्यान.

परिणाम – ब्लॉकदरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते वाशी, बेलापूर, पनवेल, नेरूळ या मार्गावरील गाडय़ा अप आणि डाउन मार्गावर पूर्णपणे बंद राहतील. मात्र मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस-कुर्ला आणि वाशी-पनवेल यांदरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. तसेच मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी नऊ ते दुपारी तीन या दरम्यान अंधेरीला जाणाऱ्या सर्व गाडय़ा फक्त वांद्रे स्थानकापर्यंतच धावतील.

पश्चिम रेल्वे : कुठे – वांद्रे-अंधेरी स्थानकांदरम्यान अप हार्बर मार्ग आणि डाउन मार्गावर सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० दरम्यान.

परिणाम – ब्लॉकदरम्यान पश्चिम रेल्वेमार्गावरील सर्व डाउन धीम्या गाडय़ा वांद्रे ते अंधेरी या स्थानकांदरम्यान डाउन हार्बर मार्गावरून चालवल्या जातील.