१३३ वर्षांची ‘निओगॉथिक वास्तुरचने’ची साक्ष देणारी इमारत

मुंबईतील सुप्रसिद्ध ज्यू-उद्योगपती डेव्हिड ससून यांच्या कुटुंबाशी नाते सांगणाऱ्या आणि इथल्या ज्यूंच्या अस्तित्वाची ओळख पटवून देणाऱ्या काळाघोडा परिसरातील ‘निसेट इलियाहो सिनेगॉग’ या १३३ वर्षांच्या ज्यूंच्या प्रार्थनाघराला पुढील काही महिन्यांत नवी झळाळी मिळणार आहे.

गेल्या १३३ वर्षांत अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेले हे ज्यू प्रार्थनाघर १९व्या शतकातील ‘निओगॉथिक वास्तुरचने’ची साक्ष देत उभे आहे. मात्र प्रार्थनाघराच्या या आकाशी रंगाच्या इमारतीला चार कोटी रुपये खर्चून आता नवी झळाळी देण्यात येणार आहे. ‘जेएसडब्ल्यू’ कंपनीने यासाठीचा खर्च उचलण्याची तयारी दर्शविली आहे.

दक्षिण मुंबईत १९व्या व २०व्या शतकात उभ्या राहिलेल्या इमारती या जगातील उत्तम वास्तुकलेचा नमुना म्हणून ओळखल्या जातात. या इमारतींशी मुंबईच्या इतिहासाचे अनेक महत्त्वाचे पैलू जोडले गेले आहेत. यातीलच एक इमारत फोर्ट परिसरातील काळाघोडा भागात असून ‘बगदादी ज्यू’ समाजाचे प्रार्थनाघर म्हणून ओळखली जाते. बगदादमधून १८३२मध्ये आलेले सुप्रसिद्ध ज्यू उद्योगपती डेव्हिड ससून यांचे पणतू जेकब ससून यांनी आपले वडील इलियाहो ससून यांच्या स्मरणार्थ १८८४मध्ये या प्रार्थनाघराची निर्मिती केली. पहिले प्रार्थनाघर डेव्हिड ससून यांनी भायखळा येथे बांधले होते. त्यानंतर त्यांच्या पणतूने या दुसऱ्या प्रार्थनाघराची उभारणी केली. ज्यू नागरिक प्रार्थनेला जाताना पायीच जातात. म्हणून या भागातील ज्यू रहिवाशांसाठी प्रार्थनाघर असावे हा तिच्या उभारणीमागील हेतू होता, असे या प्रार्थनाघराच्या ट्रस्टचे अध्यक्ष सॉलोमन सोफर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. १९८५साली तत्कालीन भारतीय राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, भारतमित्र म्हणून परिचित असलेले इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष शिमून पेरेस यांनी या प्रार्थनाघराला भेट दिली होती, असेही सोफर यांनी सांगितले. दगडी बांधकामातील ही इमारत व आतील विविध भाग कमकुवत आणि जीर्ण झाल्याने या इमारतीचा पुनर्बाधणी करण्यात येणार आहे. मुंबईतील पुरातन वास्तुरचनाकार व अभ्यासक आभा लांबा व त्यांचे सहकारी या प्रार्थनाघराची नव्याने रचना करणार आहेत. यासाठी संपूर्ण इमारतीची फेरउभारणी करण्यात येणार असून सर्वप्रथम इमारतीचे छत व अंतर्गत दुरुस्ती करण्यात येईल. त्यानंतर आतील तावदाने बदलण्यात येतील.

जेरुसलेमच्या दिशेने..

‘गॉसलिंग अ‍ॅण्ड मॉरिस’ या तत्कालीन ब्रिटिश वास्तुरचनाकार कंपनीने या प्रार्थनाघराची रचना केली होती. मुंबईतील १९व्या शतकातील ‘निओगॉथिक’ शैलीतल्या इमारतींप्रमाणेच या इमारतींची वास्तुरचना करण्यात आली आहे. यात कलाकुसर केलेले खांब व संगमरवरी खडकावर उभारलेला प्रार्थनेचा आतील मनोरा आणि रंगीत तावदाने हे या प्रार्थनाघराचे विशेष आकर्षण आहे. महिलांना मुख्य प्रार्थनाघरात प्रवेश नाही. त्यांच्यासाठी दुसऱ्या मजल्यावर एका खास गॅलरीची उभारणी केली आहे.