कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील महासभेत डबघाईला आलेल्या परिवहन व्यवस्थेवर चर्चा होत असताना बसपची महिला नगरसेविका मोबाईलमध्ये गेम खेळण्यात मग्न असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे नगरसेवक जनतेच्या कामासाठी  महापालिकेत जातात की मोबाईलवर गेम खेळण्यासाठी असा संतप्त सवाल शहरातील नागरिक उपस्थित करत आहे.

महापालिकेत बुधवारी महासभा होती. महासभेत परिवहनच्या अर्थसंकल्पावर चर्चा होती. महासभेत आधीच मोजक्या नगरसेवकांची उपस्थिती होती. उपस्थित असलेल्यांमध्ये महिला नगरसेविकांचे प्रमाण जास्त होते. महासभेत परिवहन विभागाची आर्थिक स्थिती यावर चर्चा सुरु होती. यादरम्यान बसप नगरसेविका सोनी अहिरे या मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न होत्या. सभागृहात कशावर चर्चा सुरु आहे याकडे त्यांचे लक्षच नव्हते. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नगरसेविका सोनी अहिरे यांनी अद्याप या वृत्तावर प्रतिक्रिया दिलेली नाही. सोनी अहिरे या डोंबिवली ग्रामीणमधील आशेळे मणेरे या प्रभागातून निवडून आल्या आहेत.

दरम्यान, मोबाईलवर खेळणाऱ्या नगरसेवकांवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरात असंख्य समस्या आहेत. या समस्यांवर नगरसेवकांनी आवाज उठवला पाहिजे. पण नगरसेवकच मोबाईलमध्ये रमणार असतील आमच्या समस्या कोण सोडणवार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेतील महासभा या सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. काही दिवसांपूर्वी दोन नगरसेवकांच्या अंगरक्षकांमध्ये महापालिकेतच राडा झाला होता. शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करुन हा वाद सोडवला होता. त्यानंतर पोलिसांनी महापालिकेत येणाऱ्या नगरसेवकांच्या गाड्यांची तपासणी केली असता या गाड्यांमधून स्टंप, लाकडी दांडके, लोखंडी सळ्या सापडल्या होत्या.