सीमाभागात कानडी भाषेच्या सक्तीवर उद्धव ठाकरे बरसले
बेळगावसारख्या सीमाप्रश्नात अडकलेल्या भागांमध्ये मराठी भाषिकांवर कानडी भाषेची सक्ती केली जाते. कोणत्याही भाषेला आपला विरोध नाही. पण मातृभाषा शिकवू न देता कानडी भाषेची जबरदस्ती करणे, ही असहिष्णुता नाही का, असा खरमरीत सवाल करत उद्धव ठाकरे यांनी सेना-भाजप यांच्यातील ‘गोडी’ला आणखी एक फोडणी दिली. नायगाव येथे मुंबई महापालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या संयुक्त महाराष्ट्र हुतात्मा स्मारक उद्यानाचे उद्घाटन उद्धव यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.
मोरारजी देसाई पंतप्रधान असताना कागदी नकाशावर केवळ रेषा मारून आमच्या मराठी बांधवांना महाराष्ट्रापासून तोडण्यात आले होते. कोणतेही सरकार आले, तरी हा सीमाप्रश्न सोडवला गेला नाही. उलट तेथील मराठी भाषिकांवर अत्याचार वाढले. आजच्या परिस्थितीत तेथील मुले आपल्याला भेटायला आल्यावर गाऱ्हाणी मांडतात. या भागात मराठीऐवजी कानडी भाषा शिकवण्याची सक्ती केली जाते, हीदेखील असहिष्णुताच नाही का, असे ठाकरे म्हणाले. शिवसेना सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आठ एकरांवर मैदान
नायगाव येथे सुमारे आठ एकर क्षेत्रावरील बॉम्बे डाइंग कंपनीच्या जमिनीवर बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र संघर्ष स्मृति मनोरंजन मैदान विकसित करण्यात आले आहे. हे उद्यान मुंबईतील मोठय़ा उद्यानांपैकी एक आहे. संयुक्त महाराष्ट्र संघर्षांचे थीम पार्क, झेन गार्डन, स्मृतिस्तंभ, ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्था, जॉगिंग ट्रॅक, रॉक गार्डन, कलात्मक हिरवळ आदी गोष्टी या उद्यानात आहेत.