सोशल मीडियावरून एका शिक्षिकेला त्रास दिल्याप्रकरणी एका ३० वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल नेटवर्किंग साइटवर हा संशयित युवक २४ वर्षीय शिक्षिकेला एक वर्षांपासून फॉलो करत होता. काही दिवसांपूर्वी त्या युवकाने पीडितेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. यासाठी त्याने पीडित शिक्षकेच्या आईला सांगितले होते. जर युवतीबरोबर माझं लग्न न लावून दिल्यास तिला पळवून नेईल आणि चेहऱ्यावर अॅसिड टाकेल अशी धमकी दिली होती. त्याने पीडित युवतीच्या आईलाही जीवे मारण्याची धमकी दिली होती, असे पोलिसांनी सांगितले.
गत जून महिन्यांपासून हा युवक सातत्याने पीडितेला त्रास देत होता. अखेर कंटाळून या युवतीने कासारवडवली पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल केला. संशयितावर भारतीय दंडविधान कलम ३५४ अंतर्गत (ड) (१) (२) आणि कलम ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. डी. तेले यांनी माहिती दिली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.