पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात कसुरी यांचा सल्ला; हुरियत नेत्यांशी चर्चेचे समर्थन

‘मुंबई राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयही आहे’

मुंबई ही महाराष्ट्राची असल्याचा मला अभिमान असून ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयही आहे. मतभिन्नता असली तरी विचारस्वातंत्र्याची जपणूक झाली पाहिजे. कोणत्याही संघटनेला या मूल्यांना धक्का लावता येणार नाही, असे सुधींद्र  कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या भूमिकेचा आणि कुलकर्णी यांच्या अंगावर तैलरंग फेकण्याच्या घटनेचा सर्वच वक्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. पाकिस्तानात अनेकदा भेटीगाठींसाठी व कार्यक्रमांसाठी गेलो असताना तेथे कधीही तो रद्द करण्याची वेळ आली नाही आणि पाकिस्तानी जनतेकडून प्रेम व स्नेह मिळाला, असे शाह यांनी सांगितले. तर ही घटना मेक इन इंडियाच्या प्रयत्नांना धक्का  लावणारी आहे, असे पाडगावकर यांनी नमूद केले.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा शांतता प्रक्रियेचा मार्ग सुयोग्य व उचित होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच पद्धतीने वाटचाल केल्यास तोडगा निघू शकतो, असे प्रतिपादन करीत पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद महमूद कसुरी यांनी सोमवारी येथे केले. काश्मीरप्रश्नी काढण्यात आलेल्या तोडग्यावर पंतप्रधान मनमोहन सिंग २००६ मध्ये स्वाक्षरी करणार होते, पण त्यादरम्यान निवडणुका आल्याने ते होऊ शकले नाही, असे त्यांनी स्पष्ट  केले. हुरियतच्या नेत्यांशी चर्चा करण्याचे समर्थन करीत सर्वपक्षीयांना मान्य तोडगा काढणे कठीण असल्याचे कसुरी यांनी सांगितले.

कसुरी यांच्या ‘नायदर ए हॉक, नॉर ए डोव्ह’ या पुस्तकाचे प्रकाशन वरळीतील नेहरू सेंटरमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी सुप्रसिद्ध अभिनेते नसरुद्दीन शाह, ज्येष्ठ  पत्रकार दिलीप पाडगावकर आणि ए. जी. नुरानी यांनी भारत-पाकिस्तान दरम्यानचे संबंध आणि पुस्तकाविषयी विवेचन केले. शांतता प्रयत्नांबाबत आपण आशावादी असल्याचे सांगून कसुरी यांनी भारत, काश्मीर आणि पाकिस्तान या सर्वाची एखाद्या तोडग्यावर सहमती होणार नाही. पण असहमतीचे संतुलन राखत किमान बाबी मान्य होतील, याचा विचार केला गेला पाहिजे, असे नमूद केले. पाकिस्तानी नेते व अधिकाऱ्यांनी हुरियतच्या नेत्यांशी चर्चा केल्या, त्यांच्या भेटीगाठी घेतल्या, तर त्याबाबत आक्षेप घेतला जातो. त्याचा उल्लेख करून हुरियतच्या नेत्यांशी चर्चा करण्यात काहीच गैर नाही. तोडगा काढण्यासाठी सर्वाची भूमिका समजून घेणे आवश्यक असते, असे कसुरी यांनी स्पष्ट केले. दोन्ही देशांमधील सर्वसामान्य जनतेला शांतता हवी असून मोदी यांनी विकासाच्या दृष्टीने सुरू केलेली वाटचाल निश्चितच योग्य आहे. मोदी यांनी वाजपेयी यांच्या मार्गाने शांतताप्रक्रिया पुढे नेल्यास त्यातून काही फलनिष्पत्ती होऊ शकते.

खेळ, सांस्कृतिक समारंभ व अन्य मार्गानी परस्पर संबंध सुधारण्यावर भर देऊन विचारांनीच शांततामय तोडगा काढला पाहिजे. भारताशी शांततापूर्ण संबंध राखणे, हे पाकिस्तानच्याही हिताचे आहे, असे कसुरी यांनी नमूद केले. कुख्यात दाऊद इब्राहिम पाकिस्तानात आहे का, या प्रश्नावर ‘मी अंतर्गत सुरक्षामंत्री नव्हतो,’ असे उत्तर देत कसुरी यांनी बोलणे टाळले.

’भेटीसाठी सुरक्षा पुरविल्याबद्दल कसुरींनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

’शिवसेनेच्या धमकीनंतरही कार्यक्रम निर्विघ्न

’सहआयुक्त देवेन भारतींसह ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मोठा फौजफाटा

’कार्यक्रमासाठी येणाऱ्यांची तीन वेळा सुरक्षा तपासणी