कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात माघी गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गायिका आणि नर्तकींवर नोटांची बरसात करणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या विभागीय कार्यालयाच्या आवारात माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने आयोजित नाचगाण्यांच्या कार्यक्रमात महापालिका कर्मचाऱ्यांनी धुंद होऊन गायिका आणि नृत्यांगनांवर नोटांची उधळण केली. या प्रकरणामुळे महापालिकेची बदनामी झाल्याने आयुक्तांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. उपायुक्त दीपक पाटील यांनी या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर केला. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजय घरत यांनी या अहवालाच्या आधारे ११ कर्मचारी दोषी असल्याचे आढळून आल्याने त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आयुक्त मधुकर आर्दड यांच्यासमोर ठेवला. या अहवालाच्या आधारे आयुक्तांनी संबंधितांना निलंबित करण्याचे आदेश दिले .