देशभरातील पोटनिवडणुकांच्या निकालावरून भाजपने धडा घेतला पाहिजे आणि स्वत:चे पाय जमिनीवर ठेवले पाहिजेत, असा सल्ला देत बुधवारी शिवसेनेने जागावाटपावरून आक्रमक झालेल्या भाजपवर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळाले होते. मात्र, पोटनिवडणुकांचे निकाल पाहता आता उलट परिस्थिती असल्याचे दिसते. यावरून भाजपने काहीतरी धडा घ्यावा. जनतेला गृहीत धरू नका, असा सल्ला शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातून देण्यात आला आहे. लोकांचे मन चंचल असून, मत कोणाला द्यायचे हा निर्णय सर्वस्वी त्यांचा असतो. देशभरातील पोटनिवडणुकांचे निकाल म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकांच्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांसाठी एक प्रकारचा इशारा आहे. त्यामुळे लोकसभेतील यशाने हुरळून न जाता, स्वत:चे पाय जमिनीवर ठेवा. जे पक्ष पोटनिवडणुकांपासून धडा घेतील, तेच राज्यातील निवडणुकीत यशस्वी होतील. अन्यथा जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे या अग्रलेखात सांगण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांचा धुव्वा उडवणारी ‘मोदी लाट’ अवघ्या चार महिन्यांत ओसरू लागल्याचे चित्र मंगळवारी लागलेल्या विविध राज्यांतील विधानसभा पोटनिवडणूक निकालांनी दाखवून दिले. भाजपच्या आमदारांनी खासदारकी मिळवल्यानंतर रिक्त झालेल्या २४ जागांसह नऊ राज्यांत झालेल्या ३२ विधानसभा जागांवरील पोटनिवडणुकीत भाजपला अवघ्या बारा जागा जिंकता आल्या. उत्तर प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमधील स्वत:च्या ताब्यातील १३ जागांवर भाजपला पाणी सोडावे लागले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्तेत येण्याचे दावे ठोकणाऱ्या भाजपला या निकालांनी मोठा धक्का दिला आहे. गेल्या दोन महिन्यांत बिहार, उत्तराखंड, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकांतही भाजपची कामगिरी घसरली होती. या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेला ओहोटी लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेश (११), राजस्थान (४) आणि गुजरात (९) या राज्यांत तर लोकसभा निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या भाजप आमदारांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे पोटनिवडणूक झाली होती. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या ताब्यातील दहा आणि मित्र पक्ष असलेल्या अपना दलाकडील एक अशा एकूण ११ जागांपैकी आठ जागांवर समाजवादी पक्षाने विजय मिळवला. राजस्थानमध्ये तर चारपैकी अवघी एकच जागा भाजपला राखता आली. येथे तीन जागांवर विजय मिळवत काँग्रेसने बाजी मारली. तर गुजरातमध्येही भाजपकडील नऊपैकी तीन जागा काँग्रेसने स्वत:कडे खेचून घेतल्या.
या तिन्ही राज्यांतील पराभव भाजपला जिव्हारी लागणारा आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील ८० पैकी ७२ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. यात भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मोठा वाटा होता. मात्र, तेथे समाजवादी पक्षाने आपली खुंटी पुन्हा बळकट केली. गुजरात आणि राजस्थान या भाजपची सत्ता असलेल्या राज्यांतील पीछेहाट भाजपसाठी धक्कादायक आहे.