लोकसभा निवडणुकीच्या वेळेस परवानगीशिवाय रॅली आयोजित केल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल हे बुधवारी कुर्ला महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर झाले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना दहा हजार रुपयांचा जातमुचलका मंजूर केला. या वेळेस ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी न्यायालय परिसरात मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती.

वाहतूक पोलिसांची परवानगी न घेताच ‘आप’च्या उमेदवार मेधा पाटकर यांच्या प्रचारासाठी रॅली काढली होती. त्यासाठी केजरीवाल यांच्यासह पाटकर व मीरा सन्याल अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाटकर आणि सन्याल यांना न्यायालयाने आधीच जामीन मंजूर केला आहे. मात्र केजरीवाल हे सुनावणीसाठी हजर न झाल्याने न्यायालयाने त्यांच्याविरोधात समन्स बजावले होते. खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा देण्याच्या विनंतीसाठी केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांना कुर्ला न्यायालयासमोर ही विनंती करण्यास सांगितले होते. त्यानुसार बुधवारी केजरीवाल कुर्ला महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर झाले आणि त्यांनी सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा देण्याची विनंती केली. न्यायालयानेही त्यांची विनंती मान्य केली. तसेच पक्षाचे नेते सतीश जैन यांनी हमीपत्र दिल्यानंतर न्यायालयाने त्यांना दहा हजार रुपयांचा जातमुचलका मंजूर केला.